Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभावीपणे राबवा; जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी । तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन समाजासाठी घातक असल्याने किशोरवयीन मुलांना तंबाखूजन्य व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. तंबाखू नियंत्रण व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम समन्वय समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचेसह विविध जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये तंबाखू किंवा तत्संबंधी पदार्थांच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याचा व्यापक प्रचार व प्रसार करण्याच्या सुचना आरोग्य, शिक्षण तसेच सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. तसेच १२ ते १७ वयोगटातील किशोरवयीन मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रामुख्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती, शाळा महाविद्यालय परिसराच्या १०० मीटरपर्यंत अशा कुठल्याही वस्तु विकल्या जाणार नाही याची खबरदारी घेणेबाबतत सूचना केल्यात. त्याचबरोबर तंबाखूचे सेवन करणाऱ्या नागरीकांचे समुपदेशन करावे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा सेवन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणाऱ्या 290 व्यक्तींकडून दंड वसूल करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी बैठकीत दिली. बैठकीस उपस्थितांनी उपयुक्त सुचनाही मांडल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तंबाखूमुक्त अभियानाच्या प्रचार साहित्याचे अनावरण करण्यात आले.

Exit mobile version