Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षण अधिकारी लाचप्रकरण : उद्या होणार तक्रारदारसह शिक्षकांची साक्ष

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव येथील तीन शिक्षकांच्या बदलीसाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दीड लाखांची लाच घेतल्याप्रकरणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे  यांच्यासमोर उद्या जाब-जबाब घेऊन साक्ष नोंदवण्यात येणार आहे. यावेळी शिक्षणाधिकारी, तक्रारदार, शिक्षकांसह पत्रकार आदींची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. 

चाळीसगाव तालुक्यातील तीन शिक्षकांनी बदल्यांसाठी अर्ज सादर केले होते. परंतु, बदलीसाठी त्यांच्याकडून तत्कालीन शिक्षणाधिकार्‍यांनी  पैसे मागितलेे. यात संबंधित तीन शिक्षकांनी देखील शिक्षणाधिकार्‍यांना पैसे दिले  मात्र   तरीही बदली न झाल्याने  या शिक्षकांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे धाव घेऊन दाद मागितली. त्यानंतर आमदार चव्हाण यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्याने संबंधित अधिकार्‍यांनी तीनही शिक्षकांचे पैसे परत केले आणि त्यानंतर बदलीही करण्यात आली होती. मात्र, तक्रारदार रवींद्र शिंदे यांनी या विषयासंदर्भात शिक्षण संचालकांकडे तक्रार केली होती. त्यावरुन शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेला या प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात पत्र पाठविले होते. जि.प.सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांनी एक सदस्यीय समिती नियुक्त करुन सामान्य प्रशासन विभागाचे  उपमुख्यकार्यकारी कमलाकर रणदिवे यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. यासंदर्भात चौकशी समितीने तक्रारदार, तीन शिक्षक, शिक्षणाधिकारी,पत्रकार आणि साक्षीदार आदींची चौकशी करुन संबंधितांचा जबाब दि.20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नोंदविण्यात येणार आहे. याप्रकरणात तीन शिक्षक काय जबाब नोंदविणार याविषयी उत्सुकता लागून  आहे.

Exit mobile version