Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाकरे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर ईडीचा दबाव : संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर ईडीच्या माध्यमातून दबाव टाकण्यात येत असून यासाठी जुनी प्रकरणे उकरून काढली जात असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उपराष्ट्रपती व्यक्कय्या नायडू यांना लिहलेल्या पत्रात त्यांनी आरोपांची सरबत्ती केली आहे.

शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.  ईडीच्या माध्यमातून मला गोवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात असल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. १७ वर्षांपूर्वी मी जमीन खरेदी केली होती, त्या प्रकरणी ईडीने तपास सुरू केला आहे. माझ्या मुलीच्या लग्नात खर्च झालेल्या पैशांचीही ईडी चौकशी करत आहे. माझ्या मुलीच्या लग्नासाठी काम करणार्‍या वेंडर्सचा देखील छळ केला जात असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

संजय राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे की, काही काळापूर्वी काही लोकांनी महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधला होता. जेणेकरून महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका व्हाव्यात, ज्यावर संजय राऊत यांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. मदत न केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकीही या लोकांनी दिल्याचे राऊतांनी या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, यात राऊत म्हणाले की,  भाजप विविध डावपेचांचा वापर करुन शिवसेना सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पत्रात म्हटले की, ’मी आणि माझ्या कुटुंबाने अलिबागमध्ये काही जमीन खरेदी केली आहे. ही जमीन १७ वर्षांपूर्वी आम्ही खरेदी केली होती. ही जमीन सुमारे एक एकर आहे. आता मी ज्यांच्याकडून जमिनी घेतल्या आहेत त्यांनाही धमकावले जात आहे. ईडीच्या कारवाईच्या भीतीने त्यांना माझ्याविरोधात बोलण्यास सांगितले जात आहे. त्यासाठी त्यांना काही पैसे देखील देण्यात आले आहे. आम्ही भाजपपासून फारकत घेतल्यानंतर समोर आले की, भाजप शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी ईडी सारख्या एजेंसीचा गैरवापर करत आहे. शिवेसना नेत्यांना निशाणा बनवला जात आहे. केवळ खासदार नाही तर शिवसेनेच्या आमदारांना देखील निशाणा बनवले जात आहे. कारण ते शिवसेनेत आहे यामुळे त्यांची ईडीद्वारे चौकशी केली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

 

 

 

 

 

 

Exit mobile version