Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता अनिल देशमुखांच्या चिरंजीवांची होणार चौकशी

मुंबई प्रतिनिधी | वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अटकेत असतांना आता त्यांचे चिरंजीव ऋषीकेश यांना देखील सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने समन्स बजावले असून त्यांची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वसुली प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात घेतलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ऋषीकेश देशमुखला आज ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

ईडीने केलेल्या दाव्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले. हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.

अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांच्या सूचनेनुसार जैन बंधू हे काम करत असल्याचा ईडीच्या अधिकार्‍यांना संशय आहे आणि त्यामुळेच त्यांना ऋषीकेश देशमुख यांचा जबाब नोंदवायचा आहे. ऋषीकेश देशमुख यांना यापूर्वीही दोनदा ईडीने बोलावले होते. पण ते केंद्रीय पथकासमोर हजर राहिले नव्हते. अनिल देशमुख यांना १२ तासांच्या चौकशीनंतर सोमवारी ईडीने अटक केली कारण ते ईडीच्या प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ करत होते. माजी गृहमंत्री ईडीच्या अधिकार्‍यांसमोर हजर होण्याची ही पहिलीच वेळ होती. ईडीने यापूर्वी देशमुख यांना चार समन्स पाठवले होते.

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार ईडीने याआधीच अनिल देशमुख यांना अटक केली असून, सध्या ते सहा नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत.

Exit mobile version