Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांना ईडीची नोटीस

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तारूढ होताच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालयातर्फे नोटीस पाठविण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज विधानसभाध्यक्षांच्या निवडणुकीत दणदणीत बहुमत संपादन केले आहे. यामुळे सरकार उद्या सहजपणे विश्‍वासदर्शक ठराव प्राप्त करणार असल्याचेही स्पष्ट झालेले आहे.

एकीकडे हे सारे होत असतांना आता शिंदे सरकार ऍक्शनमध्ये आल्याचेही दिसून येत आहे. या अनुषंगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस पाठविल्याचे वृत्त आहे. संजय पांडे यांची आयुक्तपदाची कारकिर्द ही वादग्रस्त ठरली होती. ठाकरे सरकारच्या मर्जीतले अधिकारी म्हणून त्यांची ख्याती झाली होती. यातून त्यांचे काही निर्णय हे वादाच्या भोवर्‍यात देखील आढळले होते. या पार्श्‍वभूमिवर त्यांना ईडीची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे. ही नोटीस मनी लॉंड्रींगच्या जुन्या केसच्या संदर्भात देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी याबाबतचे संपूर्ण विवरण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

Exit mobile version