Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

मुंबई प्रतिनिधी । १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे.

१०० कोटींच्या वसुली आदेश प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अटक करण्यात आली आहे. अनेकदा समन्स बजावूनही ते ईडी समोर चौकशीसाठी हजर झाले नव्हते. मात्र काल पावणेबाराच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात गेले. यानंतर सुमारे १३ तास चौकशी झाल्यानंतर देशमुख यांना अटक करण्यात आली. मनी लाँड्रिंगसह विविध कलमांखाली ही सर्व कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

आज २ नोव्हेंबरला सकाळी त्यांना ईडीच्या कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. त्यांची सकाळी मेडिकल होणार असून, त्यानंतर ईडीच्या स्पेशल कोर्टात त्यांना नेण्यात येणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात याआधी अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, या अटकेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून याचे व्यापक पडसाद उमटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आता त्यांना किती दिवसांची कोठडी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version