Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा. उन्मेश पाटलांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

चाळीसगाव प्रतिनिधी । खासदार उन्मेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्ह्यात विविध विकास कामांचे आयोजन करण्यात आले आहे. 

एक सर्वसामान्य घरात जन्माला येऊन पाठीमागे कुठलाही राजकीय वारसा नसताना माझ्या सामाजिक वाटचालीत अनेकांचे वेळोवेळी आशीर्वाद मला मिळाले. या जनतेच्या उपकारातून मला या जन्मी उतराई होता येणार नाही. शासनाच्या विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने मी आजवर प्रयत्नशील राहीलो आहे. आज डॉ.शामाप्रसाद मुखर्जी रूर्बन योजनेअंतर्गत 90 कोटी रुपये खर्चाच्या पातोंडा बहाळ क्लस्टरचे भूमिपूजन झाल्याने या परिसरातील बळीराज्याच्या जीवनात आनंद देणारा राज्यातील हा एकमेव प्रकल्प ठरणार आहे. तसेच 22 कोटी रुपये खर्चून अजिंठा चौफुली ते मैत्रीयाज हॉटेल चौफुली रस्ता कामाला सुरुवात झाली आहे. आज आयुषमान भारत योजनेतून कोरोनासह १३०० प्रकारच्या आजरांवर प्रतीवर्ष मोफत उपचार देणाऱ्या मतदार संघातील ८ लाख २२ हजार जनतेला डिजीटल कार्ड वाटप करण्याचे नियोजन केले आहे. सात्यत्याने जनतेच्या विकासासाठी नेहमीच रात्रंदिवस पाठपुरावा करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शासन आणि जनता यांच्या दुवा बनून सर्वाधिक लाभ मिळवुन देण्यासाठी विविध शिबिरे शासकीय योजनांची जत्रा भरून सामन्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे. आपल्या निःस्वार्थी आणिअभूतपूर्व प्रेमामुळेच मी आमदार आणि खासदार होऊ शकलो याची आयुष्यभर राहील यापुढेही जनसेवेची धडपड सुरूच ठेवीन. कधीही  उतणार नाही, मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही अशी भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिञ परिवाराच्या वतीने चाळीसगाव येथे पाटीदार भवनात सायंकाळी अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भाजपचे राज्य प्रवक्ते संजय शर्मा, लोकनियुक्त नगराध्यक्ष आशालता चव्हाण, जेष्ठ कार्यकर्ते सुरेश महाराज भाजप जिल्हा उपाध्यक्ष के.बी. दादा साळुंखे, पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील,माजी सभापती संजय पाटील, नगरसेवक नितिन पाटील  यांच्यासह अनेक नगरसेवक जिल्हाभरातील आजी माजी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. माजी प.स.सदस्य दीनेश बोरसे यांनी सूत्रसंचलन केले.

जिल्हयात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेसात वाजता ब्राह्मणशेवगे ता.चाळीसगाव परीसरात असलेल्या निसर्ग टेकडीवर वटसावित्री पौर्णिमा निमित्त 151 वडाच्या झाडांची वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न झाला  तसेच वसंतराव नाईक हरित क्रांती योजनेअंतर्गत अकरा हजार वृक्ष लागवड शुभारंभ करण्यात आला. या परिसराचा कायापालट होणार असून सध्या ऑक्सिजनची किंमत प्रत्येक भारतीयाला कळाली आहे. यातून आपण बोध घेऊन या वृक्षलागवड चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी यावेळी केले. हिरकणी महिला मंडळाच्या सदस्यानी  खासदार उन्मेश दादा पाटील व सौ. संपदाताई पाटील यांचा वडाचे झाड देऊन सत्कार केला. यानंतर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन योजनेअंतर्गत राज्यातील व जिल्ह्यातील एकमेव पातोंडा बहाळ क्लस्टर  साठी 90 कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी साडेबारा कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ पातोंडा, न्हावे,ढोमणे, टेकवाडे बहाळ

या परिसरात करण्यात आला. या क्लस्टरच्या माध्यमातुन गावातील अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण,भूमिगत गटार,पोहच रस्ता,गुरांसाठी गावहाळ,ग्रेडिंग अँड पॅकिंग शेड, जिमखाना इमारत (व्यायामशाळा),गोडावून इमारत,कोल्ड स्टोरेज(शितगृह),बाजार ओटे बांधकाम,बहुउद्देशीय इमारत, स्मशानभूमी नवीन इमारत,पशुवैद्यकीय दवाखाना इमारत, जिल्हा परिषद शाळा संरक्षण भिंत,प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत संरक्षण भिंत,प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत संरक्षण भिंत,जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, रायपनिंग चेंबर ( केळी पिकवणे),कृषी औजार बँक, मिल्क चीलिंग प्लांट,डिजिटल शाळा डिजिटल अंगणवाडी, वाचनालय,इलेक्ट्रिक पोल उभारणी,आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज पशुवैद्यकीय साहित्य,आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र ,शुद्ध पाण्यासाठी RO प्लांट,अंगणवाड्यांची दुरुस्ती अशी गावाचा चेहरा मोहरा बदलणारी विकास कामे होणार आहे.पाचोरा येथे उन्मेशदादा पाटील मित्र परिवार व लालबागचा राजा चेरीटेबल ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न झाले.तसेच पाचोरा येथील अटल भाजपा कार्यालयात  कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सतीश शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतराव पाटील, भाजप शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस गोविंद शेलार यांच्या शुभहस्ते आयुष्यमान भारत योजनेतील तालुक्यातील 225000 पात्र लाभार्थ्यांना कार्ड वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

जळगाव येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत अजिंठा चौफुली ते विमानतळ मैत्रीयाज हॉटेल पर्यंत सुमारे 22 कोटी रुपये खर्चाच्या नुतनीकरण व काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगेपाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, नगरसेवक धीरज सोनवणे,माजी नगरसेवक आबासाहेब कापसे, अतूल हाडा, मनोज काळे, मनोज भांडारकर, अरविंद देशमुख, इंजी. प्रकाश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.  सायंकाळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग जळगाव ते चांदवड रस्त्यावरील आधुनिक नऊ मीटर उंच एलईडी पथदिवे लोकार्पण करण्यात आले. यात  पाचोरा येथील 142 इलेक्ट्रिक पोल, भडगाव येथील 84 आणि खडकी ते चाळीसगाव या परिसरातील 112 इलेक्ट्रिक पोल पथदिव्यांसह शहरातील 171पथदिव्यांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या दूरदृष्टी नियोजनातून 37 लक्ष खर्चातून साकारलेल्या मालेगाव रस्त्यावरील चाळीसगाव शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील भगवती उद्यानाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. उमंग परिवाराच्या अध्यक्षा सौ. संपदाताई पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण , नगरसेविका विजया पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. चाळीसगाव येथे मुख्य अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी आयुष्यमान भारत डिजिटल कार्डच्या तालुक्यातील वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या 21 दिवसाचे 21 यशस्वी मार्ग या कार्यक्रमातील सहभागी महिलांना स्मृतिचिन्ह वाटप खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या सर्व कार्यक्रमांना ठीकठिकाणी पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

खासदारांच्या मातोश्री मंगलाबाई पाटील यांच्या भावनिक सत्काराने सभागृह भारावले

खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने एक आगळावेगळा सत्कार करण्यात आला. ज्या मातेने खासदार उन्मेशदादा पाटील यांच्यावर संस्कार घडविले त्यांचा उचित सत्कार यावेळी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने राज्य पदाधिकारी संजीव निकम यांच्या हस्ते करण्यात आला.मातोश्री मंगलाबाई पाटील यांच्या संस्कारातून उन्मेशदादा यांच्यासारखे अनमोल रत्न घडले असून उन्मेश दादांची विनम्रता ही आईसाहेबांची देणगी असल्याचे प्रतिपादन यावेळी निकम व प्रमूख अतिथी संजय शर्मा यांनी केले.मातोश्री मंगलाबाई पाटील यांचा खणानारळाची ओटी भरून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पाटीदार भवनातील शेकडो उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मातोश्री मंगलाबाई पाटील यांना जणू भावनिक साद घातली. आपले मनोगत व्यक्त करताना खासदार उन्मेश दादा पाटील भावनिक झाले होते.

 

Exit mobile version