Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईश्वरबाबुजी जैन यांची २४.६३ कोटी रूपयात फसवणूक; नाशिकच्या व्यावसायिकासह पाच जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । उसनवारीने घेतलेले २४ कोटी ६३ लाख १६ हजार रूपये परत न करता जळगावातील नामांकित सराफा व्यावसायिक तथा माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचप्रमाणे पैसे परत करण्यासाठी बनावट ॲग्रीमेंट तयार केल्याचे देखील उघड झाले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात नाशिक येथील अशोक बांधकाम व्यवसायिकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिकच्या अशोक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक मोतीलाल कटारीया आणि जैन यांचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. कटारिया यांनी जैन यांना व्यवसाय करण्याची गरज सांगून सन २०१०-११ व २०१४-१५ दरम्यान वेळोवेळी  ११ कोटी आणि १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० रूपये असे एकुण उसनवारीने घेतले. यातील काही रक्कम कटारिया यांनी परत केली. ६ कोटी ९९ लाख ३६ हजार ७४१ आणि १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० असे एकुण २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रूपये कटारिया यांच्याकडे बाकी होते. त्यानंतर २ ऑक्टोबर २०१५ रोजी कटारिया हे राजेंद्र चिंधुलाल बुरड, स्नेहल सतीष पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री यांना सोबत घेवून सराफा बाजारातील कार्यालयात आले. त्यावेळी त्यांनी पैसे परत करण्याची पुन्हा मुदत वाढ मागितली. यासाठी कटारिया यांनी जैन यांना एक जॉइंट व्हेंचर अॅग्रीमेंट करुन घेण्याचे सांगीतले. त्या कागदपत्रांवर जैन यांनी सह्या केल्या. त्यानंतर मानराज मोटर्स यांना पैसे देण्याचे सांगून जैन यांनी पुन्हा कटारिया यांच्याकडे पैश्यांची मागणी केली. दरम्यान कटायिा यांनी ज्या जमिनीबाबत कागदपत्र तयार केले होते. त्या जमिनीचा नाशिक न्यायालयात वाद सुरू आहे. त्याचा निकाल प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्या कागदपत्राच्या आधारे जैन यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जैन यांनी शनिपेठ पोलीसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून न नाशिकच्या अशोक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक मोतीलाल कटारीया, राजेंद्र चिंधुलाल बुरड, स्नेहल सतीष पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, आशीष अशोक कटारीया, सतीष धोंडूलाल पारख (सर्व रा. नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.

Exit mobile version