Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा. पाटलांनी घेतली पालिकेच्या सर्व विभागांची आढावा बैठक

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक महिन्यांपासून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नसल्याचे कारण सांगून चाळीसगाव नगरपरिषदेच्या अनेक विभागात नागरिकांच्या समस्या सातत्याने वाढतच गेल्या असून शहरातील विकासकामाचा वेग मंदावला. खा. उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत आज पालिकेच्या सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली असून खा. पाटील यांनी आपल्या कामात सुधारणा करा, जनतेच्या समस्या मार्गी लावा. नियोजित विकासकामांना गती द्या.अन्यथा माझ्याशी गाठ आहे. अशी तंबी आज खा.पाटील यांनी दिली. 

आज खा.उन्मेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पालिकेच्या विभाग निहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आशालता चव्हाण, मुख्याधिकारी नितीन कापडणीस,पालिकेतील गटनेते संजय पाटील, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, मुख्य अभियंता विजय पाटील,उपे मुख्याधिकारी स्नेहा फडतरे, सभा लिपिक विजय खरात, पाणीपुरवठा अभियंता राजीव वाघ, स्वच्छता निरीक्षक दिलीप चौधरी, संजय गोयर,सचिन निकम,वीज अभियंता कुणाल महाले, योगेश मांडोळे, लेखापाल कुणाल कोष्टी, नगर अभियंता नितीन देवरे,संगणक अभियंता महेश शिंदे,कर निरीक्षक राहुल साळुंके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सुमारे तीन तास चालली बैठक 

खा. पाटील यांनी प्रत्येक विभागनिहाय आढावा घेतला यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना, आदेश देत पालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकारी नसल्याचे कारण सांगून विभागांमध्ये मरगळ आली असून आपापल्या विभागातील कामाबाबत नागरिकांच्या शहरातील धूळयुक्त रस्ते, पथदिवे, पाणी, स्वच्छता आदी तक्रारींचा निपटारा करा. असे आदेश यावेळी खा.उन्मेश पाटील यांनी दिले.

शहरातील चौकांचे सुशोभीकरण मार्गी लावा.

अकरा नंबर शाळेतील इनडोअर स्टेडियम, खरजई नाका चौक, राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या कार्यालय वसतीगृह चौक, पोलीस स्टेशन समोरील सावरकर चौक, छत्रपति शिवाजी महाराज पुतळा बांधकाम कामाची पाहणी, या चौकाचे विस्तारीकरण या कामांबाबत पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. छञपती शिवाजी महाराज पुतळा हा चौक देखणा व्हावा यासाठी वाहतूकीस अडचण ठरणारा स्टेशन रोड कडील कारंजा बांधकाम काढून टाकण्याच्या सूचना यावेळी दिल्या. याप्रसंगी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

औरंगाबादच्या धर्तीवर तिरंगा झेंडा बसविणार

औरंगाबाद येथील क्रांती चौका जवळ असलेल्या २१० मीटर उंच तिरंगा झेंडा उभारला आहे. याच धर्तीवर छञपती शिवाजी महाराज पुतळा समोर असलेल्या कारंजा चबुतरा असलेल्या जागी तिरंगा झेंडा बसविणार असल्याचे माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली असून यासाठी मुख्याधिकारी नितिन कापडणीस,नगर अभियंता विजय पाटील, वास्तू विशारद प्रशांत देशमुख यांनी याबाबत अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी अशी सूचना यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली.

 

Exit mobile version