Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करणार ! : पटोले

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाने महिलांचा कायमच सन्मान  करत त्यांना समान संधी दिली आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल या महत्वाच्या पदावर काँग्रेसने महिलांना संधी दिली. महिलांना राजकारणात महत्वाची जबाबदारी देण्याची काँग्रेसची परंपरा आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग आणखी सक्रीय व्हावा यासाठी प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात येत असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात पटोले म्हणाले की, महिलांना राजकीय प्रवाहात सामिल करून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने नेहमीच महत्वाची भूमिका बजावलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतीकारी निर्णयही काँग्रेस पक्षाच्या सरकारनेच घेतला. आताही उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ४० टक्के महिलांना उमेदवारी देण्याचा क्रांतीकारी निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस व उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंकाजी गांधी यांनी घेतला व त्याची अमंलबजावणीही सुरु केली आहे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत ४० टक्के महिलांना उमेदवारी देऊन त्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. ‘लडकी हूँ’ लड सकती हूँ’, अशी घोषणा देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.

महाराष्ट्रालाही मोठी परंपरा लाभलेली असून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकत प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्थानिक पातळीवर महिलांना जास्तीत जास्त संधी देऊन त्यांचा राजकारणातील व निर्णयप्रक्रियेतील सहभाग आणखी वाढावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

Exit mobile version