Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांच्या मृत्यूने विद्यापीठावर शोककळा

नागपूर प्रतिनिधी | येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिवंगत डॉ. सुधीर मेश्राम यांच्या सौभाग्यवती तथा विद्यापीठातील माजी विभागप्रमुख डॉ. प्रा. ज्योत्स्ना मेश्राम यांनी आज नागपुरात नवव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तर त्यांच्या मृत्यूने विद्यापीठावर शोककळा पसरली आहे.

याबाबत वृत्त असे की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम (५५) यांनी सोमवारी पहाटे मनीषनगर येथील जयंती मॅन्शन-७ या अपार्टमेंटच्या ९ व्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्या माजी कुलगुरु दिवंगत डॉ. सुधीर मेश्राम यांच्या पत्नी होत. डॉ. सुधीर मेश्राम यांचे काही महिन्यांपूर्वी कोरोनामुळे उपचार घेत असतांना निधन झाल्यानंतर त्या मानसिक तणावात असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

डॉ. प्रा. ज्योत्स्ना मेश्राम या अमेरिकेत आपल्या मुलाकडे गेल्या होत्या. आठ दिवसांपूर्वीच त्या परत आल्या. मनीषनगरातील जयंती मॅन्शन-७ मध्ये त्यांची मावशी राहते. काल त्या मावशीकडे आल्या होत्या. सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ९ व्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूची वार्ता येताच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर शोककळा पसरली. त्यांनी विद्यापीठात विभाग प्रमुख म्हणून कार्य केले असल्याने कर्मचार्‍यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर, मेश्राम दाम्पत्याच्या अकाली अंताबद्दलही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Exit mobile version