Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघाने पटकविला आयएमए चषक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महायुथ कॉन अंतर्गत नाशिकरोड आयएमए येथे पार पडलेल्या क्रिकेटच्या अंतीम सामन्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघाने नाशिकरोड आयएमए संघाचा १० धावांनी पराभव करून मानाचा आयएमए चषक पटकविला. तर बुध्दीबळ, कॅरम, टेबल टेनिस आणि डबल टेबल टेनिस या स्पर्धेतही डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली. दरम्यान या सर्व यशस्वी स्पर्धकांचा वैद्यकीय महाविद्यालयाचे चेअरमन तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

नाशिक रोड येथे द्वितीय आयएमए महाराष्ट्र स्टेट कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रशांत भूतडा यांच्या मार्गदर्शनाखाली महायुथ कॉन अंतर्गत महाविद्यालयीन स्पर्धाही घेण्यात आल्या. यात क्रिकेटच्या अंतीम सामन्यात नाशिकरोड आयएमए आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा संघ यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना झाला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघाने प्रथम फलंदाजी करीत ६ षटकात ६० धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करतांना नाशिकरोड आयएमएची चांगलीच दमछाक झाली. अवघ्या ५० धावांवर नाशिकरोड आयएमएचा संपूर्ण संघ बाद झाला. १० धावांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा संघ अंतीम सामन्यात विजेता ठरला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघाला मानाचा आयएमए चषक देऊन गौरविण्यात आले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघात डॉ. दिशांत पाटील, डॉ. यश लोखंडे, डॉ. पंकज राजपूत, डॉ. अभिनव गादेवार, डॉ. सुरेश सामळष, डॉ. प्रशांत वानखेडे, डॉ. आयुर वाघे, डॉ. किरण बागलाणी यांचा समावेश होता. मॅन ऑफ द सिरीज म्हणून डॉ. दिशांत पाटील यांना पारितोषिक देण्यात आले.

डॉ. सुचेता दोशींनी दाखविले बुध्दीचे बळ
बुध्दीबळ स्पर्धेत १० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात अंतीम सामन्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. सुचेता दोशी यांनी विजयी ठरत आपल्या बुध्दीचे बळच दाखविले. तसेच कॅरम स्पर्धेत डॉ. निकीता इंगोले, टेबल टेनिस स्पर्धेत डॉ. दिशांत पाटील, डबल्स टेबल टेनिस स्पर्धेत डॉ. दिशांत पाटील, डॉ. पंकज राजपूत हे उपविजेते ठरले.

महाविद्यालयाचे अध्यक्ष, रजीस्ट्रार यांच्याकडून शाबासकी
नाशिक रोड येथे झालेल्या स्पर्धेत चमदार कामगिरी करीत विजयी ठरलेल्या सर्व स्पर्धकांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी शाबासकी दिली. तसेच विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छाही दिल्या. याप्रसंगी प्रा. नीलेश बेंडाळे उपस्थित होते. सर्व यशस्वी स्पर्धकांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर व प्राध्यापक वृंदाचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version