जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वृद्धांच्या आरोग्यविषयक समस्या, आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय, आधुनिक उपचारपद्धती आणि वेदनाविरहित जीवनासाठी आवश्यक असलेल्या उपशामक आरोग्यसेवेवर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव आणि जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी ‘जेरियाट्रिक मेडिसिन : फ्रॉम प्रिव्हेन्शन टू पॅलिएशन’ या विषयावर कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन (सी.एम.ई.) परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या डॉ. केतकीताई पाटील सभागृहात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ही परिषद पार पडणार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या वयोमानामुळे ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्यांवर या परिषदेत विशेष भर दिला जाणार आहे. वृद्धापकाळातील आजारांचे वेळीच निदान, प्रतिबंधात्मक उपचार, योग्य वैद्यकीय व्यवस्थापन तसेच गंभीर आजारांमध्ये रुग्णांना वेदनामुक्त आणि सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी आवश्यक असलेल्या उपशामक उपचारपद्धतींची माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे.

या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे ती हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येणार आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) यांच्याकडून या परिषदेसाठी दोन क्रेडिट पॉईंट्स मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांसाठी ज्ञानवृद्धी आणि व्यावसायिक कौशल्य अद्ययावत करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे परिषदेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतच डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकीताई पाटील, कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. प्रशांत सोळंके (डीन) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
परिषदेचे आयोजक अध्यक्ष म्हणून मेडिसिन विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. सी. डी. सारंग जबाबदारी सांभाळत आहेत, तर आयोजक सचिव म्हणून मेडिसिन विभागाचे सहप्राध्यापक डॉ. युवराज बढे काम पाहत आहेत.
या परिषदेत वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून, यामध्ये डॉ. सी. डी. सारंग, डॉ. सी. ए. कांते, डॉ. युवराज बढे, डॉ. पल्लवी बढे, डॉ. अभय जोशी, डॉ. विजया दाते, डॉ. अनिता बसवराज, डॉ. अंजली शेटे, डॉ. अपर्णा साधळे, डॉ. प्रमोद उमरजी, डॉ. भूषण चोपडे, डॉ. चिमू चोपडे आणि डॉ. गुणवंत महाजन यांचा समावेश आहे. वृद्धापकाळातील विविध आजार, उपचारांमधील आधुनिक दृष्टिकोन आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवेच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर हे तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत.
या सी.एम.ई. परिषदेत वैद्यकीय अधिकारी, पदव्युत्तर विद्यार्थी, पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना सहभागी होता येणार आहे. वैद्यकीय ज्ञानात सातत्याने भर घालणे, उपचारपद्धतींमधील नवे बदल समजून घेणे आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही परिषद उपयुक्त ठरणार आहे.