Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ.आर.बी.वाघुळदे

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरच्या प्राचार्य पदावर डॉ.आर.बी.वाघुळदे यांची निवड करण्यात आली असून आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला.

तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर च्या प्राचार्य पदावर नवनिर्वाचित प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे यांची दिनांक २५/११/२०२३ रोजी प्रत्यक्ष मुलाखतीत निवड झाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी आज प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला, विशेष म्हणजे प्राचार्य डॉ.आर.बी.वघुडदे यांना जळगाव येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात २३ वर्ष प्राचार्य पदाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. तसेच त्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा तर्फे उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार देवून सन्मानित ही करण्यात आले आहे.

प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर त्यांनी आपल्या मनोगातून सांगितले की युवकांच्या आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्राचार्य पद अत्यंत जबाबदारीचे आणि महत्वाचे पद आहे. त्या पदाची गरिमा आणि स्व.लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी व विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या स्वप्नातील पिढी घडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच पुढील काळात संस्थेच्या भरभराटीसाठी व शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेन, तसेच सहकारी प्राध्यापक आणि इतर सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने परिसरातील जास्तीतजास्त युवकांना उच्च शिक्षणासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक ते सर्व उपक्रम राबवून सुसंस्कृत व जबाबदार नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असा निर्धार केला.

याप्रसंगी संस्थेचे सन्मा. उपाध्यक्ष- डॉ.एस.के.चौधरी, चेअरमन- लीलाधर विश्वनाथ चौधरी, सेक्रेटरी-प्रा.मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य-डॉ.जी.पी.पाटील, सदस्य- श्री.संजय चौधरी आदि मान्यवरांनी प्राचार्य डॉ.वाघुळदे यांचे स्वागत आणि सत्कार केला. तसेच संस्थेचे कर्मचारी नितीन सपकाळे व महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी, आप्तेष्ट, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन सत्कार करण्यात आला.

Exit mobile version