Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.जब्बार पटेल यांची निवड

jabbar patel

मुंबई, वृत्तसंस्था | अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी अखेर प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि रंगकर्मी डॉ.जब्बार पटेल यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाट्यसंमेलनाचे हे १०० वे वर्ष असल्याने नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष कोण होणार ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज पटेल यांच्या नावाची घोषणा केली.

 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत जब्बार पटेल यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली. पटेल यांच्या नावावर आम्ही मागेच शिक्कामोर्तब केले होते. आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेऊन पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येत असल्याचे कांबळी म्हणाले. १०० व्या नाट्यसंमेलनाबाबत काही ठरले नव्हते. त्यामुळे हे संमेलन पुढे जाईल की काय ? अशी चर्चा होती. आता तो विषयही राहिला नाही. राष्ट्रपती राजवट उठली आहे. राज्यात नवे सरकार आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कलाप्रेमी असून ते नाट्यपरिषदेला सर्व सहकार्य करतील अशी आशा आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, १००व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जब्बार पटेल आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांचाही अर्ज आला होता. त्यामुळे संमेलनाच्या अध्यक्षपदाची चुरस वाढली होती. संमेलनाध्यक्ष कोण होईल ? याकडे नाट्यप्रेमींचे लक्ष लागले होते.

जब्बार पटेलांचा प्रवास
संवेदनशील निर्माते आणि दिग्दर्शक असलेल्या पटेल यांनी मराठी सिनेसृष्टी आणि रंगभूमीला अत्यंत दर्जेदार सिनेमे आणि नाटक दिली आहेत. ‘ सामना’, ‘सिंहासन’, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’, पु ल. देशपांडेनी लिहिलेला ‘एक होता विदूषक’ आदी दर्जेदार चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. अनेक पैलू असणार्‍या डॉ. आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ हा चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट भाषांतरीत झाला आहे. पटेलांनी थिएटर अकादमी या प्रायोगिक नाटकांसाठीच्या नाट्यसंस्थेची स्‍थापना केली आहे.

Exit mobile version