Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

( Image Credit Source : Twitter )

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन 2022-23 च्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज 22 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून नागरिकांना अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवकांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख रुपये, 75 हजार रुपये, 50 हजार रुपये व 25 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवकांना प्रत्येकी रुपये 50 हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी रुपये 25 हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी दिली आहे.

Exit mobile version