Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथे पाठ्यपुस्तक निर्मिती करणाऱ्या डॉ. जगदीश पाटील यांचा सन्मान

jagadis patil

 

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषद माध्यमिक शिक्षण समितीने अभिनंदन ठरावाद्वारे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मितीत काम करणारे शिक्षक डॉ. जगदीश पाटील यांचा सन्मान नुकताच करण्यात आला आहे. शिक्षण सभापती मंगला आवटे, माजी सभापती ॲड. बोधराज चौधरी, प्राथमिकचे माजी शिक्षण सभापती ॲड. तुषार पाटील व माजी सभापती राजेंद्र आवटे यांच्या उपस्थितीत डॉ. पाटील यांना अभिनंदन ठरावाची प्रत देण्यात आली.

भुसावळ नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच डॉ. जगदीश पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला आहे. नगरपरिषद भु.संचलित द.शि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उपशिक्षक म्हणून कार्यरत असतांना डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे येथील मराठी विषयासाठी अभ्यास मंडळ सदस्य म्हणून गुणवत्तेच्या आधारे निवड झाली होती. त्यांनी इयत्ता आठवी व दहावी पाठ्यपुस्तक निर्मितीत काम केले आहे. त्यांची ही निवड भु.न.प. व शाळा यांच्यासाठी गौरवाची बाब असल्याने त्यांचा सन्मान म्हणून नगरपरिषदेच्या माध्यमिक शिक्षण समितीने थेट प्रोसिडींगवर ठराव घेत डॉ. जगदीश पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला आहे. या ठरावासाठी सूचक ॲड. बोधराज चौधरी तर अनुमोदक शैलजा नारखेडे आहेत.

यांनी व्यक्त केले मनोगत
हा ठराव केल्यानंतर डॉ. पाटील यांचा ठरावाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सभापती मंगला आवटे म्हणाल्या की, मी स्वतः शिक्षक असल्याने शिक्षण क्षेत्रातील उच्च पातळीवर काम करणार्‍या शिक्षकाचे महत्त्व मी जाणत असल्याने सांगून डॉ. पाटील यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला आणि विद्यार्थी, समाज व संस्थेला अशा शिक्षकांचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी सभापती ॲड. बोधराज चौधरी म्हणाले की, शिक्षकाने अध्यापन करता अभ्यासक्रमाचे चिंतन करून विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे, असे सांगून डॉ. पाटील यांनी अध्यापन करता करता थेट अभ्यासक्रम निर्मिती व मूल्यमापन आराखडा तयार करण्यापर्यंत मजल मारल्याचे सांगितले. प्राथमिकचे माजी सभापती तथा भुसावळ तालुका वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. तुषार पाटील म्हणाले की, स्वतः पीएच. डी. होवून त्याचा ङ्गायदा विद्यार्थ्यांना होण्यासाठी सातत्याने काम करून विविध शैक्षणिक संशोधनांवर देखील डॉ. पाटील यांनी भर देत वाचन, चिंतन, मनन व वक्तृत्वाच्या बळावर शिक्षकांना मार्गदर्शन करतांना उत्कृष्ट वक्ता म्हणून ख्याती मिळविली असल्याचे सांगितले.

माजी सभापती राजेंद्र आवटे यांनी डॉ. जगदीश पाटील यांच्या बालभारतीवरील निवडीमुळे भुसावळच्या शैक्षणिक चळवळीच्या शिरपेचात खर्‍या अर्थाने मानाचा तुरा रोवला गेल्याचे सांगितले. भुसावळ नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच डॉ. जगदीश पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version