Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माती आणि मातेला विसरू नका – मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी । प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षादेखील जिद्दीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माती आणि मातेला मात्र विसरू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील 79 उमेदवारांचा गौरव समारंभ महाराष्ट्र विधानमंडळामार्फत विधानभवन येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी यावेळी उपस्थित होते.

प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, आता पंख फुटले आहेत, मोठी भरारी घ्यायची आहे. त्यामुळे कोणतीही जबाबदारी पार पाडताना सकारात्मक बदल घडून माझे राज्य, देश सर्वोत्तम झाले पाहिजे ही जिद्द बाळगा. शासन आणि प्रशासन ही दोन चाके असल्याने चुकीचे काम होऊ न देता चांगल्या कामावर ठाम राहून आपल्या हातून उत्तम कार्य घडो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. राज्यातील सध्याचे प्रशासकीय अधिकारी उत्तम काम करीत असून सर्वांच्या सहकार्याने शासन सकारात्मकतेने काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. श्री.नाईक निंबाळकर यांनी, सरकार कुणाचेही असले तरीही प्रशासकीय अधिकारी हा महत्त्वाचा घटक असल्याने कायदा योग्य रितीने वापरून सर्वसामान्यांची कामे सकारात्मकतेने करा, असे सांगितले. विधिमंडळाद्वारे प्रशासकीय सेवेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या सत्काराचा पायंडा यापुढेही कायम राहील असेही ते म्हणाले.

श्री.पटोले यांनी विधीमंडळामार्फत सत्काराचा हा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याची माहिती देऊन हा सत्कार राज्याच्या वतीने असल्याने पुढील पिढीसाठीही मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले. शासनाने राज्यातील प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षण केंद्र सर्व विभागीय पातळीवर सुरू करून त्यांचे सशक्तीकरण करावे, अशी सूचनाही केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या इमारतीत हा सत्कार होत असल्याने याला विशेष महत्त्व असल्याचे सांगून आपण कोणतीही जबाबदारी पार पाडताना सर्वसामान्यांना न्याय देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण कराल, असा विश्वास व्यक्त केला. आपण मिळविलेले यश हे मोठे आहे. अनेक उमेदवार हे सर्वसामान्य घरातून आलेले आहेत, सर्व यशस्वी उमेदवारांचे कौतुक करून कोणताही प्रश्न टाळण्यापेक्षा संवेदनशील बनून तो सोडवण्यावर भर द्यावा. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन आपल्या हातून लोकाभिमुख काम व्हावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

महसूलमंत्री श्री.थोरात यांनी राज्य किंवा देश पुढे नेण्यात अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी असल्याचे सांगून राज्याचा नावलौकिक वाढवा, अशा शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version