Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमिषाला बळी पडू नका-आदिवासी विकास विभागाचे आवाहन

 

जळगाव, प्रतिनिधी । आदिवासी विभागाच्या खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगून काही व्यक्ती, संघटना लाभार्थ्याकंडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.अशा कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल विनिता सोनवणे, यांनी केले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटूंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे पुर्नजीवन राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या दि. 9 सप्टेंबर, 2020 च्या शासन निर्णयाने केले आहे. खावटी अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटूंबीयांना लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी करावयाचे अर्ज, पोचपावती, नोंदवह्या आदी बाबीचे नमुने तयार करण्याचे काम शासन रावर सुरु आहे. तथापी, असे निर्दशनास आले आहे की, काही संघटना, व्यक्ती आदिवासी बांधवांकडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण लाभार्थ्यांना करत आहे. सदर बाब बेकायदेशीर असल्याने अशा तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या खाजगी अमिषाला अथवा गैरप्रकाराला बळी न पडता खावटी अनुदान योजनेबाबत अधिकची माहिती प्राप्त करण्यासाठी उपप्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. उपप्रादेशिक कार्यालय, यावल आणि प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल येथे संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती सोनवणे, प्रकल्प अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version