Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

थोरातांना वसुलीतून वेळ मिळतो का ? : विखे पाटील

संगमनेर प्रतिनिधी | महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना वसुलीतून वेळ मिळतो का ? असा सवाल करत माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज थोरात आणि प्राजक्त तनपुरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते संगमनेरातील मोर्चात बोलत होते.

संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतीचे वीज कनेक्शन कापू नये, वीजबिलं माफ करावी ही मागणी करत शेकडो आंदोलकांच्या घोषणांनी संगमनेर शहर दुमदुमून गेले. गेल्या दोन वर्षापासून राज्यातील कोणताही घटक राज्य सरकाच्या कारभारावर समाधानी नाही. तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते तरी पूर्ण करा, अशी मागणी करत सरकारला केवळ वसुली करायचं माहीत आहे. राज्यातील सामान्य जनतेशी यांना काहीही देणं घेणं नाही असा घणाघाती आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना शेतकर्‍यांचे प्रश्न समजले आहेत का? थोरातांना वसुलीतून वेळ मिळतो का? असा टोलाही यावेली विखे-पाटलांनी लगावला आहे. कोणतेही सरकार आलं तर शेतकर्‍यांना मदत गरजेची आहे.  तुमची वसुली थांबवा आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, अशी टीका विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

दरम्यान, वीज वितरणची थकबाकी भाजप सरकारमुळे वाढल्याचा आरोप ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला होता यावर विखे-पाटील यांनी तनपुरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तुमचं अपयश आणि पाप झाकण्यासाठी तुम्ही भाजप सरकारवर आरोप करत आहात. आता सरकार तुमचं आहे, तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? असा सवाल तनपुरेंना विखे-पाटलांनी केला आहे.

 

Exit mobile version