Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ व्हिडीओ प्रकरणी करा सखोल चौकशी : सोमय्यांची मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एका मराठी वृत्तवाहिनीने समोर आणलेल्या आक्षेपार्ह व्हिडीओजची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली असून त्यांनी याबाबत देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.

 

लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीने स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचे अश्‍लील व्हिडीओ व्हायरल झाल्याचा दावा करत गौप्यस्फोट केला. यात सोमय्या हे अश्‍लील शब्दांमध्ये चॅटींग करत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. अशा प्रकारचे अनेक तासांचे चॅटींग उपलब्ध असल्याचा दावा लोकशाही मराठी या वाहिनीने आपल्या वृत्तामध्ये केलेला आहे. काल सायंकाळी याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच मोठी खळबळ उडाली. विरोधी पक्षांनी आणि त्यात देखील शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

 

दरम्यान, आज सकाळी किरीट सोमय्या यांनी आपले मौन सोडले. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले असून याबाबतची माहिती एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. यात म्हटले आहे की, ”मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी. तसेच ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे,” असंही सोमय्यांनी नमूद केले आहे.

Exit mobile version