Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या सभेत दिले आहे.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज ऑनलाईन संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, पोलीस निरिक्षक बापू रोहोम, सहाय्यक पोलीस निरीक्षक (नाहसं) पी. एस. सपकाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र गिरासे आदि उपस्थित होते तर विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी ऑनलाईन सहभागी झाले होते. 

पिडीतांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी अशा गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहू नये याकरीता पोलीस विभागाने आवश्यक ते नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी दिल्या होत्या. या बैठकीमध्ये श्री. राऊत यांनी न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती घेऊन पिडितांना नियमानुसार अर्थसहाय्य तातडीने मंजूर करण्याच्याही सूचना दिल्यात.

प्रारंभी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी माहे मेअखेर अनुसूचित जातीची 13 तर अनुसूचित जमातीची 4 असे एकूण 17 गुन्हे पोलीस तपासावर असल्याची माहिती बैठकीत दिली. त्यापैकी 11 गुन्ह्यांची निर्गती पोलीस विभागाने केली आहे. उर्वरित 6 व जूनमध्ये नव्याने दाखल झालेले 10 असे एकूण 16 गुन्हे पोलीस तपासावर असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जून 2021 मध्ये 5 पिडीतांना 6 लाख 87 हजार 500 रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती श्री. पाटील यांनी बैठकीत दिली.

 

Exit mobile version