Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हास्तरीय शिक्षक गीत – गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प . वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिर तसेच ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. सर्वप्रथम के सी ई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, केसीई बी. एड. महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे, शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील एकूण 50 शिक्षकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मराठी, हिंदी गीतांच्या सादरीकरणाने सुमधुर अशी वातावरण निर्मिती यावेळी झाली. दैनंदिन कामकाजाच्या व्यापातून एक दिवस आनंदाचा क्षण शिक्षकांनी यावेळी अनुभवला व आपल्या कलेला मिळालेल्या व्यासपीठाचा परिपूर्ण उपयोग करून आपली कला सादर केली.
सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक योगेश चवरे, जि. प. प्रा.शाळा वडगांव तिघ्रे (कितना हसीन चेहरा), द्वितीय सोनल कपोते नानासाहेब आर. बी. पाटील विद्यालय, जळगांव (जांभूळ पिकल्या झाडाखाली), तृतीय राजेंद्र राठोड – जि. प. शाळा वडगाव, पाचोरा (जो गीत नहीं जन्मा) , उत्तेजनार्थ १ राकेश सपकाळे – गो. से. माध्य. विद्यालय पाचोरा (मेरे नैना सावन भादो), उत्तेजनार्थ २ रूपाली चौधरी जि. प. शाळा राणीचे बांबरुड (चिंब पावसानं).

सर्व विजयी स्पर्धकांना केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांच्या आई स्व. उषाबाई दिनकरराव वडोदकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे, शशिकांत वडोदकर, मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते रोख बक्षिसे तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
परमेश्वराला गायन कला खूप आवडते म्हणून आपण ही कला जपावी व आपण ज्या गीताचे सादरीकरण करत आहोत त्याची परिपूर्ण माहिती आपणास असावी त्याचे राग, ताल, चित्रपट, लेखक, गायक याविषयी आपण अभ्यास करावा असे मार्गदर्शन शशिकांत वडोदकर यांनी केले.

स्पर्धेसाठी कपिल शिंगाणे तसेच अक्षय गजभिये हे परीक्षक म्हणून लाभले. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले सूत्रसंचालन कल्पना तायडे यांनी केले तर आभार उपशिक्षक सूर्यकांत पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक डी. ए. पाटील, उपशिक्षक चतुर सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version