Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावात सावित्रीच्या लेकींना शालोपयोगी साहित्य वाटप

धरणगाव प्रतिनिधी । येथे मोठा माळीवाडा परिसरात नवरात्री व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकींना महेंद्र महाजन मित्र परिवाराने विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले. प्रास्ताविकात महेंद्र महाजन हे निरंतर समाजकार्यात अग्रेसर असतात. “शिकाल तर टिकाल” या वाक्याला अनुसरून  शाळा सुरू व्हायच्या आधी प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना मोफत वह्या, स्कूलबॅग, शूज व शालोपयोगी साहित्य उपलब्ध करून देतात. मागील लकाही दिवसांपूर्वी पिंपळे रस्त्यालगत असलेल्या तलावाचे खोलीकरण केले होते. तसेच, महेंद्र भाऊंनी कोविड १९ च्या काळात मोठा माळीवाडा परिसरात व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप केलेल्या होत्या. त्यांनी केलेले आर्थिक व शारीरिक योगदान विसरता येणार नाही. आपल्यापुरतेच पाहणाऱ्या काळात गरजूंची मदत करणे कठीण असते. महेंद्र भाऊंसारखे मोजकेच लोकं इतरांच्या सेवेसाठी वाहून घेतात. (फरक इतकाच असतो की, ते कधीही प्रकाशझोतात येत नाही.) यामुळे अश्या लोकांकडून प्रेरणा मिळते. म्हणून इतरांनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन प्रेरणा घेऊन अधिकाधिक सहभाग वाढवावा. याच उद्देशाने त्यांनी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, व सर्व विद्यार्थी मित्र- मैत्रिणींना अनमोल उदाहरण देऊन “वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल”  असे प्रतिपादन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.

आलेल्या सर्व मान्यवरांचे महेंद्र महाजन मित्र परिवाराकडुन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी होते तर उद्घाटक माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष निलेश चौधरी, लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंदनराव पाटील, जेष्ठ नागरिक तुळशीराम माळी, व्यापारी सेनेचे तालुकाप्रमुख दिनेश येवले, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, नपा गटनेते विनय (पप्पू) भावे, विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, माळी समाजाचे पंच दशरथ बापू महाजन, विजय महाजन, पी. डी. पाटील सर, धानोराचे माजी सरपंच भगवान महाजन, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक विलास महाजन, भागवत चौधरी, सुरेश (बुट्या) महाजन, पत्रकार जितेंद्र महाजन, धर्मराज मोरे, माजी नगराध्यक्ष संजय चौधरी, हेमंत चौधरी, काँट्रॅक्टर मोहन महाजन, जगदंबा कन्स्ट्रक्शनचे वाल्मिक पाटील, भानुदास पाटील, तौसिफ पटेल, गुलाम मोमीन तसेच महात्मा फुले चौक येथील सर्व जेष्ठ सन्माननीय बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले चौक येथील सावित्रीच्या लेकींना वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विजय महाजन, भगवान महाजन, निलेश चौधरी, पी. एम. पाटील यांनी सामाजिक कार्यक्रमाची स्तुती केली व महेंद्र महाजन यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गुलाबराव वाघ यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शहरात अनेक सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवीत असतो. प्रत्येक वार्डात लसीकरण, कोरोना काळात रुग्णांची सेवा, शहरातील रस्ते, स्मशानभूमी, पाण्याची सोय, शौच्छालय गृह, विविध शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप, तरुणांसाठी वाचनालय, मार्गदर्शन शिबिर असे अनेक कार्यक्रम आम्ही शिवसेना पक्षाच्या व नगरपालिकाच्या माध्यमातून राबवित असतो. जनतेने आम्हाला सहकार्य करावे असे प्रतिपादन गुलाबराव वाघ यांनी करून महेंद्र महाजन यांच्या सामाजिक उपक्रमाची स्तुती करून त्यांना व उपस्थितांना नवरात्रीच्या सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनपर व्ही टी माळी यांनी उपस्थितांना अशोका विजयादशमी व वाचन प्रेरणा दिनाच्या सदिच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली. तर महेंद्र (भैय्या) महाजन यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा फुले मित्र मंडळ व ज्ञानेश्वर माळी, शेखर माळी, कान्हा माळी, भाऊसाहेब माळी, नाना माळी, अभिजित माळी, ऋषिकेश माळी, दादू माळी, विक्रांत माळी, भरत माळी, गोलू माळी, योगेश माळी, मनोज माळी, भावेश माळी, पवन माळी, जयराम माळी, रवींद्र माळी आदींनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version