Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना धनादेश वाटप

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांच्या वारसांना धनादेश वाटप करण्यात आले.

नगरपरिषद क्षेत्रातील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेमध्ये कर्तव्य पार पाडतांना कोरोनाची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचारी यांना सानुग्रह सहाय्य अनुदान देण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. पाचोरा नगरपरिषद आस्थापनेवरील मयत कर्मचारी कै. राजेंद्र देवचंद भिवसने (क्लिनर) यांचे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेत कर्तव्यावर असतांना कोविड – १९ चे संक्रमणामुळे मृत्यू झाल्याने तसेच कै. नरेंद्र युवराज अहिरे (समुदाय संघटक) यांचे अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावत असतांना कोविड – १९ चे संक्रमणामुळे मृत्यू झाल्याने त्यांचे पात्र वारसांना सानुग्रह सहाय्य अनुदान मिळणेकामी पाचोरा नगरपरिषदतर्फे शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

पाचोरा नगरपरिषदेतर्फे शासनाकडे पाठविलेले उक्त दोन्ही मयत कर्मचारी यांचे प्रस्ताव मंजुर झाल्याने प्रती मयत कर्मचारी ५० लाख रुपये याप्रमाणे एक कोटी रुपये सानुग्रह सहाय्य अनुदान नगरपरिषदेस प्राप्त झालेले आहे. आज दि. १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचे दालनात श्रीमती शोभा बाविस्कर यांचे हस्ते दोन्ही मयत कर्मचारी यांचे वारस श्रीमती किरण राजेंद्र भिवसने व श्रीमती पंचशिला नरेंद्र अहीरे यांना प्रत्येकी ५० लाख रुपये सानुग्रह सहाय्य अनुदानाचे धनादेश वितरीत करण्यात आले. याप्रसंगी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी दोन्ही वारस श्रीमती किरण राजेंद्र भिवसने व श्रीमती पंचशिला  नरेंद्र अहीरे यांना सानुग्रह अनुदानाची रक्कम ही मुलांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी पैशाचे चांगल्या प्रकारे नियोजन करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे कुटूंबियांचे सात्वंन देखील केले.

श्रीमती किरण राजेंद्र भिवसने व श्रीमती पंचशिला नरेंद्र अहीरे यांनी व त्यांच्या कुटूंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले म्हणून मुख्याधिकारी शोभा बाविस्कर तसेच पाचोरा नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले. सदर अनुदान प्राप्त होणेसाठी आस्थापना लिपीक विशाल दिक्षीत यांनी सतत पाठपुरावा करून अनुदान मागणी साठी विशेष प्रयत्न केले म्हणून त्यांचे विशेष आभार मानले. यावेळी उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, ललित सोनार सह पाचोरा नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Exit mobile version