Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळच्या दोन नगरसेवकांविरूध्द अपात्रतेची याचिका

भुसावळ प्रतिनिधी । पदाचा गैरवापर करून लाभ मिळवल्यामुळे येथील भाजपचे गटनेते मुन्ना तेली आणि स्वीकृत सदस्य चंद्रशेखर अत्तरदे यांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी रवींद्र भोळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

रवींद्र नारायण भोळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केलेल्या अर्जात मुन्ना तेली आणि चंद्रशेखर अत्तरदे यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. यासाठी सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे की, भुसावळातील हरित क्षेत्र विकसीत करण्यासाठी निविदा पद्मालय कन्स्ट्रक्शन जळगाव यांनी रुपये दोन कोटी ५० लाख ४४ हजार १८१ रुपये भरुन ठराव क्रमांक ४९ अन्वये काम देण्यात आले. या कामासाठी स्वीकृत नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी मेसर्स अनिकेत अ‍ॅग्रो सर्व्हिसेस यांच्याशी संयुक्त करार करुन ठेका घेतला. यात अत्तरदे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, पालिकेतील भाजपचे गटनेते मुन्ना तेली यांनी मुलगा आसीफ आणि आशीक यांच्यासह अकलाक इस्माईल तेली यांच्या नावावर जुना सातारा ते अशोक रोडवेजपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची ४८ लाख ५९ हजार ५९६ रुपयांची निविदा आशा कन्स्ट्रक्शन या नावाने घेतली असून हे काम अलीकडेच पूर्ण करण्यात आले आहे. या कामात मुन्ना तेली यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुन्ना तेली आणि चंद्रशेखर अत्तरदे यांनी महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम १६ (१) (आय)चा भंग केल्याने कलम ४४ नुसार अपात्र करावे अशी मागणी रवींद्र भोळे यांनी केली आहे. त्यांच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र रॉय हे काम पाहत आहेत.

Exit mobile version