Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर सत्तार आणि खैरैंमधील वाद मिटला

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मध्यस्थीने अखेर माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वादावर पडदा पडला आहे.

चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वाद प्रचंड गाजल्याने आज सत्तार आणि चंद्रकांत खैरे या दोघांनाही मातोश्रीवरून बोलावण्यात आलं होतं. हे दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांना भेटले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांशी चर्चा करून यशस्वी मध्यस्थी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांमधील वाद संपल्याचं स्पष्ट केलं. दोन्ही नेत्यांचे गैरसमज दूर झाले आहेत. दोघांनी पक्षप्रमुखांना त्रास होणार नाही, असं काम करणार नसल्याचा शब्द दिला आहे. दोन्ही नेते पक्षाच्या शिस्तीत आणि चौकटीत राहून कामं करतील. पक्षाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणार आहेत, असं शिंदे म्हणाले. दरम्यान, आमचा रिमोट कंट्रोल मातोश्रीच आहे. त्यामुळे पक्षाच्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल. गैरसमजातून ज्या घटना झाल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती होणार नाही. आमच्यातील वाद मिटले असून सर्व गैरसमज दूर झाले आहेत, असं सत्तार यांनी सांगितलं. खैरे यांनीही सर्व गैरसमज दूर झाल्याचं सांगत शिवसेना वाढवण्यासाठी हातात हात घालून काम करू असे सांगितले.

Exit mobile version