Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जंतुनाशके व घंटागाडी दुरुस्ती बिलापोटी मुख्याधिकाऱ्याची मागणी; प्रांत कार्यालयासमोर उपोषण

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।   येथील एका ठेकेदाराकडून केलेल्या कामाच्या बिलापोटी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी ह्या अवाजवी रक्कमेची मागणी करत असल्याने संबंधित ठेकेदार सुरेश (पप्पु) पाटील यांनी २१ सप्टेंबर सकाळी ११ वाजेपासून उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

त्यांच्या या आमरण उपोषणास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, मराठा सेवा संघ, क्षत्रिय गृप, वंचित बहुजन आघाडी, पाचोरा तालुका पत्रकार संघ यासह विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

सिटी वेस्ट मॅनेजमेंट सेल्स अँन्ड सर्व्हिसेस या फर्मने पाचोरा नगरपरिषदेस जंतूनाशके पुरविणे व घंटगाडया दुरुस्ती करणे अशी पुरवठा व सेवेची कामे केलेली असुन ३ एप्रिल २०२३ रोजी एकूण झालेल्या १५ लाख ६ हजार ३०० रुपयांपैकी बिलापोटी ६ लाख रुपये नगरपरिषद प्रशासनाने अदा केलेले आहेत. परंतु उर्वरीत बिलासाठी गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून वारंवार नगरपरिषद मुख्याधिकारी शोभा बावीस्कर यांना भेटून बिलाची मागणी केली असता अगोदर ३० टक्के प्रमाणे २ लाख ७० हजार रुपये रोखीने लेखाविभागात जमा करा अन्यथा बिल मिळणार नाही. इतक्या मोठ्या रक्कमेची तरतूद करून दिल्यास संस्थेला मोठे नुकसान होईल. संस्थेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने खूप मानसिक तान सहन करावा लागत आहे. इतर बिले वेळेवर अदा केली जात असून पैसे न दिल्यामुळे अडवणूक केल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी लोकप्रतिनिधी असतांना अशी अडचण आलेली नाही परंतु प्रशासक काळात अशा प्रकारे अवाजवी पैश्यांची मागणी होत असल्याने २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून सिटी वेस्ट मॅनेजमेंट सेल्स अँन्ड सर्व्हिसेस चे सुरेश (पप्पु राजपुत) गणसिंग पाटील यांनी पाचोरा उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणस्थळी उबाठा सेनेचे शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, उबाठा सेनेचे शहर प्रमुख अनिल सावंत, अॅड. अविनाश भालेराव, मा. नगरसेवक नसीर बागवान, सुनिल शिंदे, क्षत्रिय गृपचे धनराज पाटील, पी. डी. भोसले, बाबाजी ठाकरे अतुल चौधरी हे उपस्थित होते.

Exit mobile version