Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किन्ही येथील आपत्तीग्रस्त कुटुंबाला जि. प. सदस्य रविंद्र पाटील यांनी दिला आधार

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील किन्ही येथे पावसामुळे घराचे नुकसान झाल्याने उघड्यावर आलेल्या कुटुंबाला जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी स्वतः आर्थिक मदतीचा हात दिला असून प्रशासनाला देखील सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी दिलेल्या आधारामुळे रस्त्यावर आलेल्या या कुटुंबाला जगण्याचा आधार मिळाला आहे.

याबाबत माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील बाळू चावदस कोळी यांच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले. या घरातील कर्ता पुरुष बाळू कोळी हे असाध्य रोगाने त्रस्त असून त्यांची पत्नी दिव्यांग आहे. हे कुटुंब अत्यंत गरीब असून त्यांची हलाखीची परिस्थिती आहे. त्यामुळे या कुटुंबाला आर्थिक हातभार मिळावा या हेतूने आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी स्वतः दहा हजार रुपयांची रोख रक्कम देऊन मदत केली. तसेच प्रशासनाला सुद्धा सूचना देऊन पंचनामा करण्याचे सांगितले आणि संबंधित कुटुंबाला सरकारी मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या. एवढेच नाही तर जोपर्यंत त्यांच्या घराची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत ज्या भाड्याच्या घरात हे कुटुंब राहणार आहेत त्याचे भाडे सुद्धा रवींद्र नाना पाटील हे स्वतः देणार आहेत. संकटात सापडलेल्या या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देऊन जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी त्यांना जगण्याचा नवा आधार दिला आहे. त्याबद्दल या कुटुंबाने त्यांचे आभार मानले असून जनतेची अशीच सेवा करण्याचा आशीर्वाद दिला आहे.

त्यावेळी सरपंचपती सचिन सोनवणे, माजी सरपंच प्रदीप कोळी, ग्रामपंचायत सदस्य सुरेश येवले, संजय येवले, जितेंद्र ठोके, किशोर पाटील, रविंद्र पाटील, शांताराम बाविस्कर, गोलु ठोके, शाम येवले आदी मंडळी उपस्थित होती.

 

Exit mobile version