Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विधवा वहिनीशी लग्न करून दिराचा मोठेपणा

जामनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज विशेष प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील मराठा समाजातील संपूर्ण समाजाने आदर्श घ्यावा अशा प्रकारची घटना घडली आहे. चुलत भावाने उच्च पदावर असताना नोकरी दिली. उच्चपदस्थ चुलत भावाचे अपघाती निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला सात जन्माची साथ देऊन चुलत वहिनीशी विवाह करून समाजापुढे नवीन आदर्श प्रस्थापित केला. जामनेर तालुक्यातील ओझर गावी ही घटना घडली. नवविवाहित दाम्पत्य त्यांनी आज सात जन्म सोबत राहण्यासाठी सात फेरे घेतले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातीलओझर येथील महाजन परिवार एक नवा आदर्श समाजात निर्माण केला! ओझर येथील महाजन परिवारातील एक उदयोन्मुख तरुण अनिल एकनाथ महाजन पुणे येथे इंडस्लंड बँकेत बँक मॅनेजर म्हणुन मोठ्या पगाराच्या नोकरीवर असताना मागील वर्षी जून महिन्यात त्यांचा चार चाकी वाहन चालवत असताना अपघाती मृत्यू झाला. त्यावेळी त्याची पत्नी प्रियंका अनिल महाजन यांना दोन महिन्याची मुलगी होती. ती दोन महिन्याची मुलगी व प्रियंका यांचा फार मोठा आधार हरवला! तरुणाची पत्नी प्रियंका कमी वयात विधवा झाली. अशा वेळी परिवारावर फार मोठा आघात झाला होता. अनिल महाजन हे ज्यावेळी नोकरीस होते त्यावेळी त्यांनी गावातील व आपल्या भावकीतील अनेक जणांना बँकिंग क्षेत्रात नोकरीला लावले होते. अनिल महाजन यांचे वडील व त्यांच्या विधवा पत्नीच्या माहेरील मंडळी प्रियंका  अकाली आलेल्या विधवापण यामुळे चिंतीत होते. तिच वय पाहता त्यांची चिंता होतीच. त्याच वेळी ईश्वरलाल जैन पतसंस्थेचे अध्यक्ष तथा दानशूर व्यक्तिमत्व  कचरूलाल बोहरा यांचे महाजन परिवाराशी असलेले निकटचे संबंध असल्याने त्यांनी अनिताला पुनर्विवाहासाठी राजी केलं. पण त्याच वेळी तिच्याशी विवाह कोण करणार ?अशी चर्चा आणि विचार विनिमय सुरू असताना प्रियंका नात्याने दिर असलेला अविवाहित शुभम सुरेश महाजन यांच्याकडे याबाबत चर्चा केली असता त्याने लागलीच होकार दिला. तसेच त्याचे वडील सुरेश महाजन यांनी होकार दिला.

त्याला कारणही तेवढेच होते .कारण शुभम याला मृत चुलत भाऊ अनिल महाजन यांनी  बँकिंग क्षेत्रातील एस बँकेत नोकरीला लावून दिले होते. भावाच्या या उपकाराची परतफेड करण्याची हीच वेळ असल्याची भावना त्याने बोलून दाखवली. लागलीच महाजन परिवारातील सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून तसेच प्रियंकाच्या माहेरीही चर्चा करण्यात आली. चर्चेअंती दोघांचा विवाह करण्याचे ठरले. आज २२ जून २०२२ रोजी मध्यप्रदेशातील इच्छापुर येथील इच्छादेवीच्या मंदिरात यांचा विधीवत विवाह सोहळा पार पडला.

तिला असलेल्या एकुलत्या एक मुलीचा पाच वर्षानंतर अनिलचे आई वडील सांभाळ करणार असून त्याचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. विशेष म्हणजे या विवाहासाठी ज्यांनी पुढाकार घेतला असे ओझर गावाचे कचरूलाल बोहरा ह्यांनी लग्नात कन्यादान केले. या लग्नासाठी बाळू पाटील, विकास महाजन ,नथ्थु चौधरी, विनोद काळबैले ,भैया भाऊ ,जावेद मुल्लाजी ,जितू महाजन व महाजन परिवाराने प्रयत्न केला. अतिशय कमी वयात कोणत्याही तरुणीला वैधव्य येऊ नये. आले तरी समाजाने अशा प्रकारच्या आदर्श विचारांना स्वीकार करून तरुणीचे विवाह लावणे ही काळाची गरज असल्याचे श्री कचरूलाल बोहरा यांनी पुण्यप्रतापशी बोलताना सांगितले.

 

Exit mobile version