Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ८ अ’ सुविधेस प्रारंभ

मुंबई प्रतिनिधी । महसूल विभागामार्फत आजपासून डिजिटल ८ अ ऑनलाईन सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा ऑनलाईन या प्रकारात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रारंभी महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यांनी उपस्थित महसूल विभागातील अधिकार्‍यांशी संवाद साधला. थोरात यावेळी म्हणाले की, सर्वसाान्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणणारा हा विभाग आहे. त्यामुळेच अनेक जबाबदार्‍या महसूल विभागावर सोपविण्यात येतात. आजपर्यंत साडे सतरा लाखांहून अधिक लोकांनी डिजिटल ७/१२ घेतला आहे त्याचप्रमाणे आता डिजिटल ८ अ ला सुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असे आवाहन ना. बाळासाहेब थोरात यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, शासकीय कामात महसूल विभागाची महत्वाची भूमिका आहे आणि म्हणूनच या विभागाला प्रशासनाचा कणा असे म्हणतात. महाराष्ट्राच्या विकासात आजपर्यंत या विभागाने महत्त्वाचे योगदान दिले असून यापुढील काळातही हा विभाग सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहील असा विश्‍वास आहे. गेला ४ महिन्यापेक्षा अधिकचा काळ आपण सर्व कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम करीत आहोत, या काळात राज्यातील महसूल यंत्रणा सक्षमपणे काम करीत होती याचा मला अभिमान वाटतो.

Exit mobile version