भले बहाद्दर ! : संपकरी एस.टी. कर्मचार्‍यांना ‘नाम फाऊंडेशन’चा मदतीचा हात

धुळे प्रतिनिधी | राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण व्हावे म्हणून निकराचा लढा देणार्‍या संपकरी एस. टी. कर्मचार्‍यांना खूप मोठ्या आर्थिक अरिष्टाला सामोरे जावे लागत आहे. याची दखल घेत ‘नाम फाऊंडेशन’ने या कर्मचार्‍यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

राज्य परिवहन विभागाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी अडीच महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. संपामुळे कर्मचार्‍यांचे वेतन मिळालेले नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कर्मचार्‍यांना मदत व्हावी यासाठी नाम फाउंडेशनच्यावतीने धुळ्यातील २५० संपकरी एसटी कर्मचार्‍यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजहिताची अनेक कामे करण्यात येत आहेत. या अनुषंगाने आता आर्थिक संकटात सापडलेल्या एस.टी. कर्मचार्‍यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. नाम फाउंडेशनचे धुळे जिल्हा समन्वयक प्रदीप पानपाटील यांच्या हस्ते ही मदत वाटप करण्यात आली. या किटमध्ये कर्मचार्‍यांना एक महिना पुरेल एवढे साखर, चहा पावडर, तांदूळ, मिरची, हळद, चटणी, साबण, पेस्ट, दाळ इत्यादी वस्तू देण्यात आल्यात. नाम फाऊंडेशनने केलेल्या या मदतीचे स्वागत करण्यात येत आहे.

Protected Content