Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गट घेणार मुख्यमंत्र्यांची भेट !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यात त्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या या दौर्‍यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी हे शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी त्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी यासाठी शिवसेना-उबाठा पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी धरणगावच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात पक्षातर्फे शेतकर्‍यांच्या हितासाठी मागण्या दिलेल्या आहेत. यात प्रामुख्याने शेतकर्‍यांना कपाशीसाठी प्रति क्विंटर १० हजार रूपयांचा भाव मिळावा; सूर्यफुलास प्रति क्विंटर ८ हजार रूपयांचा भाव मिळावा; पंतप्रधान पीक विमा योजनेत संपूर्ण भरपाई मिळावी, शेतकर्‍यांना दिवसा पूर्ण दाबाने आठ तास वीज पुरवठा मिळावा; कृषी पंपाच्या थकबाकीची रक्कम माफ करण्यात यावी; शेत कर्ज घेण्यासाठी सिबील स्कोअरची अट रद्द करावी; वायदे बाजारावरील बंदी तातडीने उठविण्यात यावी; शेतीमालास उद्योगाचा दर्जा मिळावा; शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ मिळावे यासाठी आधीच्या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी; सौर कुपन योजना १०० टक्के अंमलात आणावी आणि रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत केळी पिकासाठी अनुदानाची रक्कम तीन ऐवजी दोन वर्षात मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version