Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव तालुक्यातील ५४ विधवा महिलांना १२ लाख ८० हजारांच्या मदतीचे वाटप

 

 

धरणगाव प्रतिनिधी | गेलेला व्यक्ती हा परत येऊ शकत नसला तरी आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावीच लागणार आहे. यासाठी राज्य शासन आणि भाऊ म्हणून आपण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील ५२ विधवांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी २० हजार तर आत्महत्याग्रस्त दोन शेतकर्‍यांच्या पत्नींना प्रत्येकी लाखाची मदत करण्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या  १८ ते ५९  वर्षे वयोगटातील कमावत्या  व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना एक महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी  २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत धरणगाव  तालुक्यातील ५२  महिलांना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण १० लाख ४० हजाराचे  मंजूर प्रस्तावाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी प्रास्ताविकात योजनेसंदर्भात सविस्तर माहिती विशद केली.

यात तालुक्यातील रेल, पाळधी, पिंप्री, वराड, भोद, बोरखेडा, पिंपळे, गारखेडा, नांदेड, सोनवद, विवरे, साकरे, गंगापुरी, झुरखेडा, हनुमंतखेडा, भवरखेडा, हिंगोणे, चांदसर, कल्याणे, चावलखेडा, जांभोरे व फुलपाट येथील महिलांचा समावेश होता. याप्रसंगी मिठाईचे पाकिट आणि एक साडी देखील त्यांना प्रदान करण्यात आली. तर याच कार्यक्रमात तालुक्यातील आत्महत्या केलेल्या २ शेतकर्‍यांच्या पत्नींना शासकीय नियमानुसार प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत आणि पिठांची गिरणी देखील देण्यात आली. तसेच या सर्वच्या सर्व ५४ महिलांना संजय गांधी निराधार योजनेतून प्रकरणे मंजूर करण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिले.

या कार्यक्रमाला सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील, राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, भगवान महाजन, भानुदास विसावे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Exit mobile version