Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावातील धाड आणि दोन कर्मचाऱ्यांची ‘शाळा’ !

Arrested 2

धरणगाव (प्रतिनिधी) अक्षय तृतीयेच्या पूर्व संध्येला शहरातील एका ठिकाणी पत्त्यांच्या क्लबवर धाड पडली. बरं अक्षय तृतीये म्हणजेच आखाजीला पत्ते खेळण्याची खूप जुणी परंपरा आहे. असो…गुन्हा तो गुन्हाच असतो. त्याला परंपरेच्या नावाखाली दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. परंतू या धाडीत एसडीपीओ कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी मोठी शाळा भरवल्याचा धक्कादायक आरोप होतोय. साधारण १५ लाखाची रोकड अवघ्या पावणे तीन लाख दाखवल्याची खमंग चर्चा देखील गावात सुरु आहे.

 

 

या गुन्ह्यातील एका आरोपी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, धाडीच्या दिवशी माझ्या खिशातून ३५ हजार रुपये जप्त केले. मात्र, फिर्याद पाहिली तर माझ्याकडून फक्त १२ हजार रुपये जप्त केल्याचे दाखवीण्यात आले होते. त्यामुळे मग प्रश्न असा निर्माण होतो की, बाकीचे पैसे गेले कुठे ? बाकीच्या ४० जणांची पण हीच ओरड आहे की, पैसे जास्तीचे जप्त केले आणि फिर्यादीत कमी दाखविले आहेत. थोडं खोलात शिरले असता माहिती अशी मिळाली की, विभागीय पोलीस अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी रेड टाकली त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. परंतू त्यांच्या पथकातील दोन कर्मचाऱ्यांनी नेहमी प्रमाणे मोठी शाळा भरवली आणि साधारण १०/१५ लाखाची रक्कम अवघ्या दोन लाख ७५ हजार ८१० रुपयांवर आणली. बरं दुसरी गंमत म्हणजे हा क्लब चालविण्यासाठी स्थानिक पातळीवर आधीच सेशन भरण्यात आले होते,अशी पण चर्चा आहे.

 

 

डीवायएसपी अग्रवाल साहेब प्रामाणिक अधिकारी आहेत. परंतु साहेबांच्या अपरोक्ष हे दोन कर्मचारी मोठी शाळा भरवून टाकतात. एसडीपीओ कार्यालयातील या दोन कर्मचारींबद्दल अनेक तक्रारी आहेत. हे दोघं ज्याठिकाणी पत्त्यांच्या क्लबवर धाड टाकतात. तेथे नेहमीच जप्त केलेले मोबाईल गहाळ झाल्याची ओरड होत असते. जर मोबाईल जप्त होतात. तर मग परत का मिळत नाही? याचाच अर्थ मोबाईल जप्त केले जातात. मात्र, फिर्यादीत दाखवले जात नाहीत. चोपडा तालुक्यातील खडगाव येथे यावरूनच काही दिवसांपूर्वी मोठा गोंधळ झाला होता. परंतु अग्रवाल साहेबांच्या धाकाने कुणीही तक्रार करायला समोर आले नाही.

 

 

यातील एका कर्मचारीवर तर आपल्या सहकाऱ्यांचेच मोबाईल चोरल्याचे आरोप आहेत. साधारण दोन वर्षापूर्वी तत्कालीन डीवायएसपी वाघमारे साहेब असतांना हा प्रकार घडला होता. त्यावेळी याबाबत बातम्या देखील प्रकाशित झाल्या होत्या. दुसरं असं की, अग्रवाल साहेबांचा धाक दाखवून या कर्मचाऱ्याने आता पर्यंत किमान बावीस वेळेस कर उतरणी केलीय. अवैध धंदे साहेबांना चालत नाही म्हणून याने धरणगावातून हप्ते वाढवून घेतल्याचेपण बोलले जातेय. धरणगावातील एका क्लबवर यावरूनच वाद झाला होता. हप्ते वाढवून पण धाड का टाकता? याचा जाब विचारल्याने संबंधित कर्मचारीने अग्रवाल साहेबांना चुकीची माहिती देत त्या क्लब चालवणाऱ्याला मारहाण केली होती. या धाडीत देखील पैसे जास्त जप्त करण्यात आले. मात्र, फिर्यादीत कमी दाखविण्यात आल्याची ओरड झाली होती. विशेष म्हणजे येथून देखील काही जणांचे मोबाईल जप्त केल्यानंतर गहाळ झाल्याचा आरोप झाला होता. दुसरीकडे चोपड्यात देखील हा गडी अशीच शाळा भरवत असल्याची चर्चा आहे.

 

 

दुसरा कर्मचारी तर पहिल्यापेक्षा आणखी भारी आहे. चोपड्यात महाविद्यालयीन पोरांकडे दारू सापडली होती. त्यावेळी आरोपींचे नाव बदलवण्यासाठी या कर्मचारीने मुलांच्या पालकांकडून २ लाख मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. अगदी धाडीत सोन सापडले तरी, दुसऱ्या सहकाऱ्याला जाण वणे कठीण असते. इतका हा कर्मचारी हुशार आहे. डीवायएसपी अग्रवाल साहेब हे प्रामाणिक अधिकारी आहेत. कायद्याच्या चौकटीतच काम करतात. त्यामुळे एक खमक्या अधिकारी म्हणून त्यांची समाजात प्रतिमा तयार झालीय. परंतू हे दोन कर्मचारी साहेबांच्या याच प्रतिमेचा फायदा घेत आपली खिसे भरून घेत असल्याचा आरोप होतोय. तसेच या दोन्ही कर्मचारीमधील एकाची नियुक्ती धरणगावला असल्याचे कळतेय. मग प्रश्न असा आहे की, हा कर्मचारी एसडीपीओ ऑफिसलाच कार्यरत रहावा, अशी कुणाची इच्छा आहे? जर कुणाची इच्छा असेलच तर त्याच्यात त्याचा काय फायदा? या गोष्टीकडे डीवायएसपी अग्रवाल यांनी लक्ष देणे गरजेचे. कारण या दोन कर्मचारींमुळे त्यांची प्रामाणिक छबी मलीन होण्याचा मोठा धोका आहे.

Exit mobile version