देवझिरी येथिल परप्रांतीयांचे अतिक्रमण हटाव मोहीम

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | देवझिरी येथील वनविभागाच्या अखत्यारीतील वनक्षेत्रमध्ये मध्यप्रदेशासह स्थानिक नागरिकांनी केलेली अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. वन्यजीव व वन विभागाच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून हे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे.

यात सातपुड्यातील देवझिरी (ता. चोपडा) राखीव वनखंड क्र. १६५ मध्ये मध्यप्रदेशासह स्थानिक नागरिकांनी अवैध अतिक्रमण केले होते. येथे ठिकठिकाणी पीक पेरणीयोग्य अतिक्रमीत वनजमिनीवरील २७ हेक्टर जमिनीवर मध्यप्रदेशातून घुसखोरी करून अनधिकृतपणे करण्यात आलेले अतिक्रमण वनविभागाने हटवले आहे.

तसेच निर्बंध असलेल्या वनक्षेत्रात उभारलेल्या अतिक्रमीत ४ झोपड्या देखील वनविभागाच्या पथकाने जमीनदोस्त केल्या आहेत. या मोहिमे करता स्थानिक पातळीवर दंडाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती. तर अडावद ( ता. चोपडा) पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी वनक्षेत्रात असून जेसीबी सह विविध फौज फाटा वन क्षेत्रात कार्यरत आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वन्यजीव, वनक्षेत्रात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली जाते.यात यंदा देखील वनक्षेत्रातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूरचे प्रवीण चव्हाण, पी.कल्याण कुमार, धुळे प्रादेशिक वनसंरक्षक दिगंबर पगार यांचे मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली.

यात चोपडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषीकेश रावळे, अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, चोपडा तहसीलदार अनिल गावीत, अडावदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांच्या सहकार्याने उपवनसंरक्षक एच.एस. पद्मनाभ, चोपडा सहा. वनसंरक्षक प्रथमेश हाडपे मोहीम राबविली.

या अतिक्रमीत जागेवर जेसीबी यंत्राच्या सहाय्याने खोल समतल चर खोदकाम अतिक्रमण काढून टाकण्यात आले. या धडक कारवाईमुळे वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सक्षम फौजफाटा घेऊन ही कारवाई करण्यात आली. वनक्षेत्रात अजूनही बंदोबस्त कायम ठेवण्यात आला.

वनक्षेत्रात कुठल्याच प्रकारचे मोबाईल नेटवर्क किंवा संपर्काची सुविधा नाही म्हणून अतिक्रमण हटविण्याच्या या कारवाईत अटीतटीच्या प्रसंगी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती करीत वनक्षेत्रात पाठविले होते.

वनक्षेत्रात कारवाई करिता देवझिरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोपाल बडगुजर, वैजापूरचे समाधान सोनवणे, यावल पूर्वचे विक्रम पदमोर, रावेरचे अजय बावणे, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील, मंडळ अधिकारी एस.वाय. सपकाळे, अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जगदीश कोळंबे यांचे सह पोलिस, एसआरपी वनतुकडी, गस्ती पथक, वनपाल, वनरक्षक, वनमजुर आदींसह ९४ पुरुष महिलांच्या पथकाने पाच जेसीबी यंत्राच्या सहाय्याने २७ हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमण व ४ झोपड्या नष्ट करण्याची मोहीम फत्ते केली.

वन जमिनीवर वनक्षेत्रातील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर अतिक्रमित जागेवर जेसीबीद्वारे खोल चर खोदण्यात आल्या आहेत व जमीन उंच-सखल करण्यात आली आहे. तसेच पावसाळ्यात येथे बाभूळ, चिलार,प्रोसोपीस, सागरगोटी, निम, साग, सादडा व इतर स्थानिक प्रजातीचे बी पेरणी केली जाणार आहे. व भविष्यात येथे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता वनविभाग घेणार आहे.

Protected Content