Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावकर देवेश भय्याच्या नावे नवीन विश्‍वविक्रम

जळगाव प्रतिनिधी | शैक्षणिक क्षेत्रात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ऑनलाईन परीक्षा व स्पर्धांमध्ये यश मिळवणार्‍या येथील देवेश भय्या या विद्यार्थ्याची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

देवेश हा जळगावच्या एल.एच. पाटील इंग्लिश स्कूलचा सातवीचा विद्यार्थी आहे. देवेश भय्याने ऑनलाइन परीक्षांची संधी हेरत नऊ महिन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करत विविध देशांतील गणिताच्या परीक्षांमध्ये १५ सुवर्णपदके पटकावली. यंगेस्ट टू अचिव्ह मॅग्झिमम इंटरनॅशनल गोल्ड मेडल इन द शॉर्ट टाइमसाठी (एज्युकेशन) त्याने हे रेकॉर्ड केले. त्याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

त्याच्या या कामगिरी बद्दल वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याची माहिती त्याला नुकतीच ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. त्याने अमेरिकेतील जॉन हापकीन विद्यापीठाचा सॅट जनरल मॅथ परीक्षेत ग्रँड ऑनर अवॉर्ड मेडल, थायलंड इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड, साऊथ एशियन मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक, सिंगापूर अँड एशियन स्कूलमध्ये मॅथ्स ऑलिम्पियाड इंटरनॅशनल ज्युनियर मॅथ ऑलिम्पियाड, हॉंगकॉंग इंटरनॅशनल आदी १५ परीक्षेत गोल्ड मेडल मिळाले आहेत. याचमुळे त्याने नवीन विश्‍वविक्रम स्थापीत केला आहे.

देवेशने आधी देखील आपल्या कर्तृत्वाने जळगावचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. तो आर्किटेक्ट पंकज भय्या व इंटिरियर डिझाइनर पल्लवी भय्या यांचा मुलगा आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version