Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवेंद्र फडणवीस आता काळजीवाहू मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील सत्ताकोंडी सुटेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार असल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, महायुतीमध्ये अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा कोणताही निर्णय झाला नव्हता. आम्ही चर्चेसाठी तयार होतो. मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद आला नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. या पार्श्‍वभूमिवर, आता शिवसेनेसोबत जाणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी आपल्याला राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याचे निर्देश दिले असून आपण हे काम पाहणार असल्याची माहिती फडणवीस यांनी याप्रसंगी दिली.

याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, अगदी आम्ही गत निवडणुकीत विरूध्द लढलो होतो तेव्हादेखील बाळासाहेब ठाकरे वा उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली नाही. मात्र शिवसेनेने विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ज्या पध्दतीत पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली ते दुर्दैवी आहे. दैनिक सामनाच नव्हे तर बाहेरदेखील आमच्यावर चिखलफेक करण्यात आली. आम्हालादेखील याचे उत्तर देता येत असले तरी आम्ही उत्तर दिले नसल्याचे ते म्हणाले. जनतेने महायुतीला कौल दिला असून आता लागलीच निवडणूक घेणे हा जनमताचा अपमान ठरणार असल्याचे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. तसेच पुढील सरकार हे भाजपचेच असेल असा विश्‍वासदेखील त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, भारतीय जनता पक्ष हा इतर कोणत्याही पक्षाला फोडण्याचे काम करणार नसल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत नमूद केले.

Exit mobile version