Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवेंद्र फडणवीस मावळते मुख्यमंत्री; सामनातून शिवसेनेचा हल्ला

0Shivsena Bjp 45

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. ‘सामना’मध्ये आज मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘मावळते मुख्यमंत्री’ म्हणून केल्याने शिवसेना-भाजपातील तणाव अधिक वाढला आहे.

 

शिवसेनेने ‘सामना’ तील आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल. सध्या आम्हाला चिंता आहे ती ओल्या दुष्काळाची आणि महागलेल्या भाजीपाल्याची! असे म्हणत ‘सामना’ने फडणवीसांना लक्ष्य केले आहे. बहुमताचा आकडा गोळा करण्यात पुढचे चारेक दिवस जातील, पण ती कसरत म्हणजे दिल्लीच्या गढूळ धुक्यात विमान उतरवण्यासारखेच आहे. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी एका बाजूला, तर दुसरीकडे शरद पवार हे सोनिया गांधी यांना भेटून नक्की काय जुळवाजुळव करतात ते पाहणे रंजक ठरेल. महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्यातील जनतेसाठी महत्त्वाचे आहे. लोकांचा तो अधिकार आहे, पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा, खोळंबा करायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळय़ा वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘सामना’ या मुखपत्राद्वारे शिवसेना भाजपला लक्ष्य करत आहे. आजच्या ‘सामना’मधील आग्रलेखाद्वारे शिवसेनेने पुन्हा एकदा भाजप आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.

Exit mobile version