Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल येत्या २७ व २८ जानेवारी रोजी रंगणार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी जळगावात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे संपन्न होत आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली असून उत्साह शिगेला पोहोचला आहे. चित्रपट विषयक प्रदर्शनी, शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, टुरिंग टॉकीज तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसह उद्घाटन व समापन सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे.

यंदा या महोत्सवाचे तिसरे वर्ष असून खान्देश व मराठवाडा क्षेत्रासह संपूर्ण राज्यातून या महोत्सवासाठी १०० हून अधिक शॉर्टफिल्म सहभागी झाल्या आहेत. तज्ञ परिक्षकांमार्फत परिक्षण करुन यातील निवडक ६० शॉर्ट फिल्मचे अधिकृत प्रदर्शन या दोन दिवसीय महोत्सवात करण्यात येणार आहे त्यामुळे जळगावकर नागरिकांना विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण लघुपट, माहिती पटांची मेजवानी मिळणार आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील अनेक गणमान्य कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक युवा कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवस उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण परिसराला चित्रतपस्वी भालजी पेंढारकर चित्र नगरी असे नाव देण्यात आले आहे तर स्क्रिनींग सभागृहांना पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे व पद्मश्री ना. धों. महानोर यांचे नाव देण्यात आले आहे.

महोत्सवाची ओपनिंग फिल्म बिसाउ कि मुक रामायण दि. २७ जानेवारी रोजी स ९:०० वा.डॉ. प्रभा अत्रे सभागृहात प्रदर्शित करण्यात येईल या नंतर महोत्सवात सहभागी निवडक ६० चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. दुपार सत्रात चित्रपट रसिकांसाठी ‘चित्रपट रसग्रहण’ या विषयावर भारतीय चित्र साधनाचे राष्ट्रीय सचिव, चित्रपट अभ्यासक श्री. अतुल गंगवार, दिल्ली यांचा मास्टर क्लास होणार आहे. तर तरुणांसाठी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्री. शिवाजी लोटन पाटील, पुणे यांचा ‘कथा निवड व दिग्दर्शन’ या विषयावर मास्टर क्लास होईल.

सायंकाळी ४:३० वा. कुलगुरू डॉ.व्हि. एल. माहेश्वरी, श्री. अशोकभाऊ जैन, डॉ. भरतदादा अमळकर, चित्रपट अभ्यासक श्री. अतुल गंगवार, दिल्ली. अभिनेत्री सुरभी हांडे इ. मान्यवरांच्या उपस्थितीत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमासह भव्य उ‌द्घाटन सोहळा संपन्न होईल. सायंकाळी ७ वा. टुरींग टाकीज या सत्रात लहान मुलांचे भावविश्व समृद्ध करणारा चित्र आर्या द डॉटर ऑफ भारत चे प्रदर्शन तसेच निर्माता दिग्दर्शक यांचेशी खुला संवाद कार्यक्रम होणार आहे.

दि. २८ रोजी फिल्म स्क्रिनींग सह दिग्दर्शक नितीन भास्कर, पुणे आणि निर्माता श्री. शरद पाटील, पुणे यांचा युवा फिल्म मेकर्स साठी मास्टर क्लास होईल. तथा दुपार सत्रात होणाऱ्या ओपन फोरम सत्रात सुप्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्षाचे औचित्य साधुन चित्र तपस्वी भालजी पेंढारकर दिग्दर्शित मराठा तितुका मेळवावा हि महोत्सवाची क्लोजिंग फिल्म प्रदर्शित केली जाईल.

संध्याकाळी ५ वा. महोत्सवाचे समापन सत्र होणार आहे. या प्रसंगी रा.स्व. संघाचे प्रांत सहकार्यवाह श्री. स्वानंद झारे, दिग्दर्शक श्री. शिवाजी लोटन पाटील, प्र. कुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे, उद्योजक श्री. प्रकाश चौबे, अॅड. सुशील अत्रे उपस्थित राहणार आहे.

या प्रसंगी भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म, कॅम्पस फिल्म, माहितीपट यांना सामुहिक तसेच वैयक्तिक पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. हा संपूर्ण महोत्सव सर्व नागरिक, रसिक श्रोते तथा चित्रपट क्षेत्रात करियर करु इच्छित तरुणांसाठी पुर्णपणे मोफत असणार आहे. मास्टर क्लास मध्ये उपस्थित युवकांना सहभागाचे प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.

या दोन दिवसीय महोत्सवाचा जळगावकर नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. राजेंद्र नन्नवरे, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, आयोजन प्रमुख श्रीमती शोभाताई पाटील, डॉ. रत्नाकर गोरे, श्री. विनोद पाटील, श्री. विनीत जोशी, श्री. किरण सोहळे, प्रा. सुचित्रा लोंढे, प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी केले आहे.

Exit mobile version