Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देश आणि काँग्रेसच्या हितासाठी गांधी घराण्यातील तिघांनी निवृत्त व्हावे ! 

नवी दिल्ली-वृत्तसंस्था| कॉंग्रेसच्या तसेच देशाच्या भल्यासाठी गांधी परिवारातील तीनही सदस्यांनी केवळ राजकारण न सोडता थेट संन्यास घ्यावा असं स्पष्ट मत ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय विश्लेषक रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या पदरी निराशा पडली असून त्यांना पंजाबची सत्ता गमवावी लागली आहे. यामुळे कॉंग्रेसची सातत्याने होणारी पीछेहाट ही चर्चेचा विषय बनली असतांना रामचंद्र गुहा यांनी या पक्षाच्या नेतृत्वावर अतिशय बोचरी टीका केली आहे.

रामचंद्र गुहा यांनी द टेलीग्राफ या वर्तमानपत्रातील आपल्या लेखात म्हटलं आहे की, देशात जो काही हिंदुत्ववाद्यांचा उच्छाद सुरू आहे त्यासाठी खरं तर गांधी परिवारच कारणीभूत आहे. गांधी परिवाराचे कॉंग्रेसमध्ये असणं हे मोदींना आणि भाजपला सोईचं आहे. त्यांच्यावर टीका करुन मोदी हे सरकारच्या अपयशापासून लोकांची दिशाभूल करण्यात यशस्वी होत आहेत.

यात गुहा यांनी म्हटले आहे की, गांधी परिवाराची पाचवी पीढी राजकारणात असून ते आता सर्वसामान्यांच्या संपर्कात नाहीत. त्यांची जनतेशी असलेली नाळ तुटली आहे. त्यामुळे त्यांचा पराभव होतोय. जवळपास २०० जागांवर कॉंग्रेसची भाजपसोबत थेट लढत होती, त्यामध्ये केवळ ८ टक्के जागा त्या पक्षाला मिळाल्या आहेत, हे पक्षाचं अपयश असल्याचंही ते म्हणाले. राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी मोदींसमोर पर्यायी उमेदवार होऊ शकत नाहीत, त्याचा फायदा हा नरेंद्र मोदींना होतोय असंही ते म्हणाले. तर कालच झालेल्या कॉंग्रेसच्या कोअर समितीच्या बैठकीत मात्र कॉंग्रेसची धुरा सोनिया गांधी यांनीच सांभाळावी असा निर्णय घेण्यात आला. या पार्श्‍वभूमिवर, रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलेल्या विचारांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे.

Exit mobile version