Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टोळीने गुन्हे करणाऱ्या ४ जणांवर हद्दपारची कारवाई !

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । टोळीने चोरी, जबरी चोरी सारखे गुन्हे करणाऱ्या पहूर पेठ येथील चार जणांच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना एक वर्षाकरीता जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी काढले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पहूर पोलीस ठा्ण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख प्रदीप राबदास पाटील (वय २४, रा. पहुर पेठ, ता. जामनेर), टोळी सदस्य शहारुख बनेखा तडवी (वय २३, रा. पहुरपेठ, ता. जामनेर), इरफान लालखॉ तडवी (वय २३, रा. पहुरपेठ, ता. जामनेर) व शेख राज शेख समद (वय २४, रा. पहुरपेठ, ता. जामनेर) या टोळीने जबरी चोरी, चोरी सारखे गुन्हे केले आहे. तसेच ही टोळी परिसरात ठिकठिकाणी दहशत माजवित असून त्यामुळे नागरिकांमध्ये या टोळीची भिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण झाला असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वेळोवेळी पोलीस ठाण्याकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा झालेली नसल्याने पहुर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सानप, सफौ. रविंद्र देशमुख, पोहेकॉ जिजाबराव कोकणे, पोना. ज्ञानेश्र्वर ढाकरे, विकास गायकवाड, गोपाळ गायकवाड यांनी टोळीच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाची चौकशी पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांनी चौकशी केली होती. चौकशीनंतर हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांच्याकडे आला. प्रस्तावाच्या चौकशीअंती चार जणांच्या टोळीला एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश गुरुवार २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता पारित करण्यात आले आहे. या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी अधिनस्त सफौ. यूनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनिल दामोदरे यांनी पाहिले.

Exit mobile version