Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत मुक्ताई पालखीचे सोमवारी होणार प्रस्थान

 मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तापी तीरावरील श्रीसंत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर जि.जळगाव येथून भीमा तीरावरील विठूरायाचे भेटीसाठी आषाढी वारीस महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मानाच्या दहा पालख्यापैकी प्रथम निघणारी श्री संत मुक्ताबाई पालखीचे प्रस्थान सोमवार दि.१४ जुन सकाळी ११ वा. जुने मुक्ताबाई मंदिर कोथळी-मुक्ताईनगर येथून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेसह मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत होणार आहे.

शेकडो वर्षापासून आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताईनगर सोबत पांडुरंगाचे दर्शनासाठी आषाढी एकादशी वारीस पायी चालत जाण्याची परंपरा असून मध्यप्रदेश खान्देश विदर्भातील भाविक दिंड्यासह या सोहळ्यात सहभागी होत असतात.700 कीमी 33 दिवसात ऊनपाऊसवारा याची तमा न बाळगता पिढ्यानपिढ्या वारी चालू राहीली आहे. मात्र मागील वर्षांपासून या वारीला कोरोनाची दृष्ट लागली असून शासनाकडून जनतेच्या हिताकरिता निर्बंध घातलेने वारी पायी न जाता बसने होत आहे. यावर्षीसुध्दा कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांचे प्रमाणभूत संताचे दहा मानाच्या पालख्यांना मान्यता दिलेली आहे. यात जळगाव जिल्ह्य़ातील संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई पालखीचा समावेश असून या पालखीचे परंपरेनुसार जेष्ठ शु.4 ला प्रस्थान होत असते. 

त्याप्रमाणेच आज सोमवार रोजी जुने मुक्ताबाई मंदिरात सकाळी11 वा.मोजक्याच वारकऱ्यांचे उपस्थितीत ना.गुलाबराव पाटील पालकमंत्री, एकनाथराव खडसे माजीमंत्री, खा.रक्षाताई खडसे, आ.चंद्रकांत पाटील  रविंद्र पाटील अध्यक्ष संत मुक्ताबाई संस्थान, सूर्यकांत भिसे अध्यक्ष राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ पंढरपूर हभप. रविंद्र महाराज हरणे पालखी सोहळा प्रमुख, श्वेताताई संचेती तहसीलदार, रामकृष्ण पवार पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती राहील.

सोशल मिडीयाद्वारे प्रस्थान सोहळ्याचे लाईव्ह प्रसारण करण्यात येणार असून भाविकांनी घरबसल्या सोहळा प्रस्थान कार्यक्रमात सहभाग घ्यावा.कुणीही कोथळी येथे येवू नये असे आवाहन मुक्ताबाई संस्थान कडून केले आहे.

पालखी प्रस्थान नंतर पालखीचा मुक्काम नविन मुक्ताबाई मंदीरात राहील शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत पालखीचे नित्योपचार पूजापाठ करण्यात येतील.

जनतेच्या हिताच्या निर्णयाचे समर्थन 

कोरोना महामारीमुळे जनतेचे आरोग्य हित लक्षात घेऊन राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयास आमचे समर्थन आहे. पालखी मार्गात गावोगाव हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनास येतात.गर्दीने महामारी वाढू नये याकरिता शासनाकडून जनतेचे आरोग्य हित लक्षात घेऊन जबाबदारीने घेतलेल्या निर्णयाचे जबाबदार संस्थान म्हणून बसद्वारा वारीचे समर्थन करीत आहोत.

 

Exit mobile version