टोल नाका चालविण्यासाठी ठेकेदाराला खंडणीची मागणी; नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद टोल नाका चालविण्याच्या बादल्यात खंडणी मागणाऱ्या एकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गाचे आता चौपदरीकरण करण्यात आले आहे. दरम्यान नशिराबाद गावाजवळ टोल नाका लावण्यात आला आहे. हा टोल नाका चालविण्याचे काम शेहवाल समशेर खान (वय-४५) रा. जुना नरसिंग नाका, चिनवाड, अहमदाबाद यांनी ठेकेदारीप्रमाणे घेतले आहे. दरम्यान २८ सप्टेंबर रोजी शेहवाल यांना एका नंबरवरून जगनभाई सोनवणे (पुर्ण नाव माहित नाही) असे नाव सांगून टोल चालवायचा असेल तर तुम्हाला दरमहा खंडणी द्यावी लागेल असे सांगितले. त्यावर पैसे देण्याचे शेहवाल यांनी नकार दिल्याने समोरील व्यक्तीने तुला पाहून घेईल अशी धमकी दिली. याप्रकरणी शेहवाल खान यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहन चौधरी करीत आहे.

Protected Content