Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी

अमळनेर प्रतिनिधी | सरकारी पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा अमळनेर यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्रांकडे केली आहे.

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात तसेच युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतःच्या मुलाला युवक काँग्रेस निवडणुकीत निवडून आणण्यासाठी महावितरणच्या सरकारी यंत्रणेचा वापर करीत अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर दबाव टाकला आहे.

कंत्राटदार यांना पैशाचे आमिष दाखवून तसेच मुलासाठी काम न केल्यास भविष्यात अडचणी येतील असा दबाव आणून धमकावले जात आहे. राज्याच्या ऊर्जा खात्याचा बोजवारा उडालेला असताना ऊर्जामंत्री राज्याकडे लक्ष न देता संपूर्ण महावितरण यंत्रणा पुत्र प्रेमासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहे; हे योग्य नाही. सरकारी पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा त्वरित राजीनामा घ्यावा ही मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे आपल्या निवेदनाच्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करीत आहोत.

सदर प्रकार अतिशय गंभीर असून अश्याच एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना पदापासून दूर व्हावे लागले होते. सदर विषयात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याविषयी त्वरित कार्यवाही संदर्भात निवेदन अमळनेर तहसिलदार यांना देण्यात आले. कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल. असा इशारादेखील यावेळी देण्यात आला. याप्रसंगी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत, शहराध्यक्ष पंकज भोई आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version