Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाहन हस्तांतरणासाठी लाचेची मागणी : पंटर विरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी | ऍक्टीव्हा या दुचाकी वाहनाच्या हस्तांतरणासाठी लाचेची मागणी करणार्‍या उप प्रादेशीक परिवहन कार्यालयातील पंटरच्या विरोधात तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍यांचा सहभागी असण्याची शक्यता असून यातील संशयितांची संख्या वाढू शकते.

याबाबत वृत्त असे की, तक्रारदार हा वाहन मालकांकडून ऑथॅरिटी लेटर घेऊन वाहनांच्या हस्तांतरणाचे काम करत आहेत. या अनुषंगाने एका होंडा ऍक्टीव्हा कंपनीच्या दुचाकीच्या हस्तांतरणासाठी ते आरटीओ कार्यालयात ६ ऑक्टोबर २०२१ रोजी आले होते. तेव्हा कार्यालयातील पंटर प्रशांत भोळे उर्फ पप्पू भोळे याने त्यांना स्वाक्षरीसाठी तीनशे रूपये आणि कार्यालयीन खर्च दिल्यानंतरच तुमचे काम होईल असे सांगितले. यामुळे तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे निरिक्षक साळुंखे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार सांगितली.

यानंतर ११ ऑक्टोबर रोजी एसीबीच्या कर्मचार्‍यांनी तक्रार नोंदवून घेत प्रशांत उर्फ पप्पू भोळे याच्या विरोधात सापळा रचला. मात्र त्याला याचा सुगावा लागल्यामुळे त्याने ही रक्कम घेतली नाही. मात्र त्याने तीनशे ऐवजी दोनशे रूपयांची डिमांड केली. तसेच दोनशे रूपयांमध्ये कोण वाटेकरी असतील असे सांगितले. जे व्हाईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी तक्रारदाराने पुन्हा लाच देण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यक्तीने लाच घेतली नाही. मात्र या सर्व प्रकरणात लाचेची मागणी करण्यात आल्याने आज तक्रारदाराने रामानंदनगर पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली.

यानुसार प्रशांत जगन्नाथ भोळे उर्फ पप्पू भोळे, (रा. जे.के. मोटार ड्रायव्हींग स्कूल, जामनेर रोड, भुसावळ) याच्या विरूध्द फिर्याद दाखल केली असून या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा संबंध असल्याची तक्रार संबंधीत तक्रारदाराने नोंदविली असून यात चौकशीतून पुढे काय निष्पन्न होणार याकडे लक्ष लागून आहे.

Exit mobile version