Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथील बीपीएल आणि अंत्योदय याद्यांमधील घोळाच्या चौकशीची मागणी

nivedan 3

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बीपीएल व अंतोदय यादीमध्ये प्रचंड घोळ असल्याने या यादीची चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आज दि. 30 ऑगस्ट रोजी येथील रहिवासी आणि शिवसेना पदाधिका-यांतर्फे तहसीलदार महेंद्र पवार यांना देण्यात आले. तसेच मागणी पुर्ण न झाल्यास शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील बीपीएलचे सर्व नियम धाब्यावर ठेवून शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभाचा गैरवापर काही नागरिक घेत आहेत. बीपीएल व अंतोदय यादीमध्ये खऱ्या खुऱ्या लाभार्थ्यांच्या समावेश नसून वार्षिक उत्पन्न ५ लाखापेक्षा जास्त असणाऱ्या तसेच १० ते २० एकर शेती असणारे, दुमजली इमारत, गाडी असलेल्या नागरिकांची नावे आहेत. त्यांची नावे वगळणे आवश्यक होते. परंतु आतापर्यंत प्रशासनाने यावर योग्य कार्यवाही केलेली नाही. मागील कित्येक वर्षापासून यादी अपडेट झालेली नाही. त्यामुळे भोंगळ कारभार समोर येत नाही. म्हणून यादी अपडेट होणे आवश्यक आहे. या बीपीएल व अंतोदय यादीसाठी फेरसर्व्हेक्षण करुन कार्यालयामार्फत योग्य चौकशी करत लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी, या यादीतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यात यावे, पात्र नसणाऱ्या लाभार्थी नागरिकांनी आपली नावे बीपीएल यादीतून कमी करण्यासाठी अर्ज मागवावे, अन्यथा गोर गरिबांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या अश्या नागरिकांवर लाभार्थी नसतांना शासकीय योजनांचा फायदा घेतला म्हणून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. याद्यांची योग्य चौकशी न झाल्यास तहसील कार्यालयासमोर शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

यावेळी उपस्थित नागरिकांनी तहसीलदार यांना आपल्या अडचणी सांगितल्या. नागरिकांनी आणलेली कागदपत्रे जमा करून घेत गोर-गरिबांवर अन्याय होणार नाही, प्रशासनातर्फे योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार यांनी यावेळी दिले आहे. निवेदनावर शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे, धनराज ठाकूर, नबी पटेल, प्रशांत बागले, मधुकर ढाके, रोहित महाले, विकास खडके, सनी जोहरी, हेमंत बऱ्हाटे, मयूर जाधव, वैशाली ढाके, प्रशांत शिरनामे, सीमा ढाके, चंद्रकांत बडगे, शुभम शेटे आणि अक्षय चौधरी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Exit mobile version