Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या  शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.

मुख्यमंत्र्यांनी काल सायंकाळी आणि आज सकाळी देखील मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनाही त्यांनी सूचना दिल्या. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २६ मिमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाड्यातले जिल्हे प्रभावित झाले आहेत.

सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व  महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असेही निर्देश त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचावा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.

यावेळी एनडीआरएफ जवानांनी तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेने उस्मानाबाद, लातूर,औरंगाबाद, यवतमाळ भागातील सुमारे शंभर जणांना वाचविले याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. उस्मानाबादमधून १६ जणांना हेलिकॉप्टर ने तर २० जणांना बोटीने वाचविले. लातूरमध्ये ३ जणांना हेलिकॉप्टरमधून तर ४७ जणांना बोटीतून वाचविले. यवतलां आणि औरंगाबादमधून अनुक्रमे २ आणि २४ जणांना वाचविण्यात यश मिळाले अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

एनडीआरएफचे  १ पथक उस्मानाबाद आणि १ पथक लातूरमध्ये असून हवाई दलाचं हेलिकॉप्टर या दोन जिल्ह्यांत बचाव कार्य करीत आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

 

 

Exit mobile version