Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा.विखेंच्या वक्तव्याचा निषेध ; पाठवला दोन हजारांचा चेक

vikhe

अहमदनगर प्रतिनिधी । कर्जत जामखेडे येथे केंद्र सरकारने दिलेले दोन हजार रुपये घेतात आणि मत दुस-या पक्षाला देतात, कमळाला मत देणार नसाल तर दोन हजार रुपये परत करा, असे विधान खा.सुजय विखे पाटील यांनी प्रचार सभेत केल्यामुळे शेतकरी प्रचंड संतापले आहे. विखेंना दोन हजारांचा चेक पाठविण्यात आला असून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत-जामखेड येथे शुक्रवारी मतदार संघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. ‘पालकमंत्र्यांनी विरोधी उमेदवाराच्या सभेला जाणाऱ्या लोकांची यादी काढावी. त्या सभेला जाणाऱ्या अनेकांच्या खात्यात मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको?, तुम्हाला कम‌ळ चालत नसेल तर ते पैसे परत करा, आम्हाला गरीबांच्या कल्याणासाठी तरी वापरता येतील,’ असे खा. सुजय विखे यांनी यावेळी शेतक-यांबाबत अपमानकारक वक्तव्य केले होते.

त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे. विखेंच्या वक्तव्याचा निषेध म्हणून काही तरुणांनी त्यांना २ हजार रुपयांचा चेक पाठवला आहे. आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये पाठवत आहोत. तुम्ही लोणीमध्ये कमळ सोडून अन्य कुणालाही मत द्यावे, ‘दोन हजारांत आपली किंमत करू पाहणारे सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील, ज्यांच्यासाठी सुजय नैतिकता बाजूला ठेवून मतांचा जोगवा मागत असून राम शिंदे व त्यांच्या पक्षाला अजिबात मतदान करू नका, असे आवाहन या तरुणांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Exit mobile version