Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दीपस्तंभच्या स्पर्धा परीक्षा संमेलनास प्रतिसाद

जळगाव प्रतिनिधी । येथील दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षा संमेलनाचे आयोजन केले असून याला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाला दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन, खेमचंद्र पाटील, संदीप पाटील, प्रा. राजेंद्र चव्हाण, संचालक जयदीप पाटील यांची उपस्थिती होती. यात अतिरिक्त आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी नियोजन, अभ्यास, एकाग्रता, सराव आणि योग्य मार्गदर्शन ही पंचसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन केले. तर प्रशासकीय सेवेत देशसेवेची मोठी संधी मिळते. स्वतःतील क्षमता आणि आवड ओळखून स्पर्धा परीक्षांकडे वळा, असा सल्ला आयकर उपायुक्त शकील अन्सारी यांनी त्यांच्या घेतलेल्या प्रकट मुलाखतीत दिला. ते पुढे म्हणाले की, शहादा या ग्रामीण आदिवासी भागात माझे शिक्षण झाले. वडील लोटगाडीवर गावोगावी कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. आमची आर्थिक परिस्थिती बेताची होती. माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते; पण आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने मी बीएस्सी पूर्ण केले. एमएस्सी करताना शिक्षक व्हावे, असे वाटले पण प्रशासकिय सेवेतून देशसेवेची मोठी संधी दिसत होती. म्हणून मी हज कमिटीच्या यूपीएससी प्रशिक्षण केंद्रात मुंबई येथे गेलो. तिथे हज समितीमुळे मी विनामूल्य राहून यशस्वी होऊ शकलो, असे सांगीतले. प्रास्ताविक जयदीप पाटील तर सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण यांनी केले. आभार चैताली पारावर यांनी मानले.

Exit mobile version